निर्भया केस : दोषींचा फाशीपासून वाचण्यासाठी नवा ‘डाव’, आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडे ‘धाव’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निर्भया सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणातील तीन दोषींनी फाशीच्या विरोधात आता आंतरराष्ट्रीय न्यायालय (आयसीजे) गाठले आहे. दोषी पवन, अक्षय आणि विनय यांच्या वतीने अ‍ॅड. ए. पी. सिंह यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात पत्र लिहिले आहे. 20 मार्चला फाशी देण्यास बंदी घालण्याची मागणी या पत्राद्वारे केली आहे.

यापूर्वी सोमवारी निर्भया सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणातील दोषी मुकेशची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली होती. मुकेशने वरिष्ठ अधिवक्ता वृंदा ग्रोव्हरवर कारवाईसाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या खंडपीठाने सांगितले की, मुकेशची याचिका सुनावणी योग्य नाही. दरम्यान, ग्रोव्हरने सुरुवातीला मुकेशच्या खटल्याची बाजू मांडली होती. २०१२ च्या निर्भया सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणात मुकेशला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

या प्रकरणात एपी सिंह म्हणाले की, राजकीय दबाव आणि माध्यमांमुळे या प्रकरणात न्याय केला जात नाही. कागदपत्र आहेत पण कोर्ट मान्य करत नाही. यामध्ये मीडिया ट्रायलमुळे न्याय होत नाही. ज्यांना फाशी नको आहे, त्यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात अर्ज केला आहे. आपली न्यायालयीन व्यवस्था दूरदृष्टी आहे. आम्हाला न्यायपालिकेवर विश्वास आहे. कोणी ना कोणी येईल जो नंतर या खटल्याची चौकशी करेल, त्यामुळे आताच इच्छा मरण द्या. म्हणून महामंत्र्यांकडे याचिका दाखल केली आहे.