निर्भया गँगरेप केस : ज्या दिवशी दोषींनी अत्याचार केले त्याच दिवशी फाशी ?

नवी दिल्ली – वृत्त संस्था – १६ डिसेंबर २०१२ रोजी देशातील सर्वात धक्कादायक घटना समोर आली. दिल्लीत एका तरुणीवर चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्काराची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी ६ आरोपींना ताब्यात घेतले होते. घटनेच्या ७ वर्षानंतरही या आरोपींना फाशी देण्यात आली नव्हती. मात्र, यातील चार दोषींना येत्या १६ डिसेंबरला फाशी देण्यात येणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. या प्रकरणातील एक आरोपी पवन गुप्ता याला मंडोली तुरुंगातून दिल्लीच्या तिहार तुरुंगात हलविण्यात आले असून तिहारमध्ये फाशीची ट्रायल देखील घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. मुकेश सिंह, विनय शर्मा, पवन गुप्ता आणि अक्षय कुमार ठाकूर या चौघांना फाशी देणार असल्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वीच घडलेल्या हैद्राबाद महिला डॉक्टरच्या सामूहिक बलात्कारातील चार आरोपींना एन्काऊंटरमध्ये ठार करण्यात आले. त्यामुळे आता इतक्या वर्ष प्रतीक्षेत असलेल्या निर्भया प्रकरणातील दोषींना फाशी देण्यात यावी अशी तीव्र मागणी सुरु आहे.

दरम्यान, या प्रकरणातील आरोपी विनय शर्मा याने फाशीपासून सूट मिळावी म्हणून दया याचिका दाखल केली होती. ही दया याचिका गृह मंत्रालयाने राष्ट्रपतींकडे पाठवली असता राष्ट्रपतींनी दयेची याचिका फेटाळून लावली.

१६ डिसेंबर २०१२ मध्ये झालेल्या बलात्कारानंतर अकरा दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर निर्भयाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर देशभरातून संताप व्यक्त होत होता. या प्रकरणातील चार दोषींना फाशीची शिक्षा झाली असून एक दोषी अल्पवयीन असल्याने दोन वर्षांनंतर त्याची सुटका करण्यात आली. तर बस चालक राम सिंह या दोषीने तुरुंगातच आत्महत्या केली. त्यामुळे अन्य आरोपी मुकेश सिंह, विनय शर्मा, पवन गुप्ता आणि अक्षय कुमार ठाकूर यांना येत्या १६ डिसेंबरला फाशी देण्यात येण्याची शक्यता असून तब्बल सात वर्षानंतर निर्भयाला न्याय मिळू शकेल.

Visit : Policenama.com 

You might also like