निर्भया केस : तिसर्‍यांदा टळली दोषींची फाशी, कोर्टानं दिली डेथ वॉरंटला स्थगिती

नवी दिल्ली : निर्भया प्रकरणातील चारही दोषींच्या फाशीला पुन्हा स्थगिती मिळाली आहे. पटियाला न्यायालयाच्या निर्णयानंतर फाशी तिसऱ्यांदा लांबणीवर पडली आहे. पटिलाया हाऊस न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत चारही दोषींची फाशी रोखली आहे. न्यायालयाने दोषींच्या विरोधात काढण्यात आलेल्या डेथ वारंटला स्थगिती दिली. यामुळे दोषींना 3 मार्च म्हणजे उद्या फाशी होणार नाही.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर दोषी अक्षय आणि पवन यांची याचिका पटियाला न्यायालयाने रद्दबातल ठरवली आहे, या दरम्यान पवनचे वकील एपी सिंह यांनी पटियाला हाऊस न्यायालयात गेले आणि सांगितले की डेथ वॉरंटवर रोख लावण्यात यावी, कारण पवनने राष्ट्रपतींकडे दया याचिका पाठवली आहे. राष्ट्रपतींकडे ही दया याचिका प्रलंबित आहे, यामुळे न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे.

न्यायालयाला दोषी पवन गुप्ताच्या वकीलांनी दया याचिका पाठवल्याची माहिती दिली, ज्यानंतर न्यायालयाने एपी सिंह यांना फटकारले आणि सांगितले की प्रत्येक गोष्ट अखेरच्या वेळीच का करतात, तर तिहार तुरुंग प्रशासनाने देखील पटियाला न्यायालयात अर्ज करुन सांगितले की दोषी पवनने राष्ट्रपतीकडे दया याचिका दाखल केली आहे.

याआधी न्यायालयात पवनचे वकील एपी सिंह म्हणाले की, माजी न्यायमूर्ती काटजू यांनी त्यांना मेलवर उत्तर दिले आहे की ते दोषींची शिक्षा माफ करण्यासाठी राष्ट्रपतींची भेट घेतील.

दोषी अक्षयच्या वकीलांनी यापूर्वी पटियाला न्यायालयात सांगितले होते की, दोषी अक्षय देखील नव्याने दया याचिका दाखल करण्याच्या तयारीत आहे कारण त्यांनी याचिका दाखल करताना पुरेसे दस्तावेज जोडले नव्हते.