निर्भया केस : फाशीपूर्वी दोषी विनयनं नाही बदलले कपडे, ‘रडत-रडत’ मागितली ‘माफी’

नवी दिल्ली :वृत्त संस्था – दिल्लीच्या रस्त्यावर सुमारे सात वर्षांपूर्वी निर्भयावर सामुहिक बलात्कार करणार्‍या आणि नंतर जीवघेणी मारहाण करणार्‍या चारही दोषींना फाशी देण्यात आली आहे. अनेक कायदेशीर अडचणीनंतर अखेर फाशीचा मार्ग मोकळा झाल्यानंतर दिल्लीच्या तिहार जेलमध्ये आज सकाळी 5.30 वाजता फाशी देण्यात आली. यावेळी तिहार जेलच्या बाहेर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

फाशी देण्यापूर्वी तिहार जेलचे अनेक अधिकारी फाशी देण्याच्या ठिकाणी पोहचले, ज्यांच्या देखरेखीखाली फाशीची प्रक्रिया पूर्ण झाली. फाशीवर लटकण्यापूर्वी जेव्हा दोषींना आंघोळ आणि कपडे बदलण्यास सांगण्यात आले, तेव्हा दोषी विनयने कपडे बदलण्यास नकार दिला. यावेळी त्याने रडण्यास सुरूवात केली आणि माफी मागू लागला.

फाशी अगोदर तिहारच्या बाहेर जमली गर्दी

दोषींना फाशी देण्यापूर्वी तिहार जेलच्या बाहेर गर्दी जमली होती. दिल्लीतील स्थानिक लोक, काही सामाजिक कार्यकर्ते फाशीपूर्वी जेलच्या बाहेर उभे होते. त्यांनी 20 मार्च हा निर्भयाला खरी श्रद्धांजली देण्याचा दिवस असल्याचे म्हटले. दोषींना फासावर लटकावल्यानंतर काही लोकांनी जल्लोष देखील साजरा केला आणि मिठाई वाटली.

– फाशीपूर्वी सकाळी 4 वाजता चारही दोषींना उठवण्यात आले आणि आंघोळ करण्यात आल्यानंतर नवीन कपडे घालण्यास सांगण्यात आले.

– यानंतर दोषींना जेल प्रशासनाकडून चहा-नाश्ता विचारण्यात आला, परंतु कुणीही नाश्ता घेतला नाही.

– यानंतर जेल प्रशासनाकडून दोषींना त्यांची अखेरची इच्छा विचारण्यात आली.

– बरोबर 5.30 वाजता चारही दोषींना तिहार जेलमधील फाशी देण्याच्या ठिकाणी फासावर लटकवण्यात आले.

दिल्ली हायकोर्टाने गुरूवारी निर्भयाच्या दोषींनी केलेली याचिका फेटाळली होती, यामध्ये फाशीची तारीख पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती. या निर्णयाच्या विरोधात निर्भयाच्या दोषींचे वकील एपी सिंह सुप्रीम कोर्टात पोहचले होते, परंतु पहाटे सुमारे 3.30 वाजता सुप्रीम कोर्टाने त्यांची याचिका फेटाळली. ज्यानंतर तिहार जेलमध्ये चारही दोषींना फासावर लटकवण्यात आले.