निर्भया केस : दोषींच्या कुटुंबियांनी नाही केला मृतदेहांवर दावा, तिहार जेल परिसरात होऊ शकतात अंत्यसंस्कार

नवी दिल्ली : वृत्त संस्था – निर्भयाच्या चारही गुन्हेगारांना आज शुक्रवारी सकाळी 5.30 वाजता फाशी देण्यात आली. चारही मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, तिहार प्रशासनाने चारही दोषींच्या कुटुंबियांना मृतदेह घेण्यास सांगितले आहे.

परंतु, आतापर्यंत चारही गुन्हेगारांच्या कुटुंबियांकडून कुणीही दावा केलेला नाही. यामुळे आता चारही मृतदेहांवर तिहार प्रशासन अंत्यसंस्कार करू शकते. ज्या जेल नंबर 3 मध्ये चौघांना फाशी देण्यात आली, तेथेच चौघांवर अंत्यसंस्कार करण्यात येऊ शकतात.

कपडे आणि सामान कुटुंबियांकडे देणार जेल

फासावर लटकवलेल्या निर्भयाच्या चारही दोषींनी आपली कोणतीही अंतिम इच्छा जाहीर केली नव्हती. तिहार जेल प्रशासनाचे म्हणणे आहे की, दोषींकडून जेलमध्ये कमावलेले पैसे त्यांच्या कुटुंबियांना देण्यात येतील. याशिवाय त्यांचे कपडे आणि सामानसुद्धा कुटुंबियांकडे देण्यात येईल.

आज सकाळी ठीक 5.30 वाजता निर्भयाचे चारही दोषी विनय, अक्षय, मुकेश आणि पवन गुप्ता यांना एकाच वेळी फासावर लटकवण्यात आले.

निर्भया दिवस साजरा करण्याची आवाहन

सात वर्ष 3 महीने आणि तीन दिवसांपूर्वी म्हणजे 16 डिसेंबर 2012 ला देशाची राजधानी दिल्लीत झालेल्या भयंकर घटनेने संपूर्ण देश हादरला होता. न्याय मागण्यासाठी रस्त्यावर लोकांचा महापूर आला होता आणि सतत ही आंदोलने सुरूच होती.

निर्भयाची आई आशा देवी यांनी दिर्घ कालावधीपर्यंत ही लढाई लढली, आज दोषींना फाशी देण्यात आल्यानंतर त्या म्हणाल्या, आज 20 मार्चला निर्भया दिवस साजरा करणार. त्या म्हणाल्या आता त्या देशातील दुसर्‍या मुलींसाठी लढाई लढणार.