निघोजच्या माजी सरपंच खुन प्रकरणातील शार्पशुटरला पुण्यात अटक

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन

निघोज येथील काँग्रेसचे माजी सरपंच संदीप मच्छिंद्र वराळ (वय ३५, रा. निघोज) यांचा पूर्ववैमनस्यातून भरदिवसा तलवारीने वार करून आणि गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. या प्रकरणी परिसरातील कुख्यात प्रवीण रसाळ टोळीशी संबंधित तिघांना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. या गुन्ह्यातील शार्पशुटर सुशिल सुखचंद लाहोटी (वय-३५, रा. उत्तमनगर, अचानकचौक, पुणे) आणि अनिल हरीश्चंद्र चव्हाण (वय-४३, उत्तमनगर, इंदिरावसाहत, पुणे) या दोघांना नगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुण्यातून अटक केली.

संदीप वराळ हे २२ जानेवारी २०१७ रोजी दुपारी दीडच्या सुमारास वराळ बसस्थानकासमोरील दुकानात दाढी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी चार मोटारसायकलवरून आलेल्या सुमारे आठ ते दहा हल्लेखोरांनी दुकानात घुसून त्यांच्यावर हल्ला केला. कोणीही मदत न केल्याने वराळ जीव वाचविण्यासाठी बाहेर पडले. हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग करत खाली पाडले. त्यांच्या तोंडावर व गळ्यावर वार केले आणि गावठी कट्यातून गोळ्या झाडून पळून गेले. या सिनेस्टाईल खुन प्रकरणामुळे निघोज परिसरात खळबळ उडाली होती. हा खून कुख्यात प्रवीण रसाळ याने केला असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला होता. पारनेर पोलिसांनी या खुनाच्या गुन्ह्यातील प्रविण रसाळ, विकास रसाळसह इतर आरोपींना यापुर्वीच अटक केली असून त्यांचेविरुद्ध मोका कायद्याअंर्तगत कारवाई करण्यात येणार आहे.

प्रविण रसाळ या कुख्यात गुंडाच्या टोळीतील शार्पशुटर सुशिल लाहोटी व अनिल चव्हाण हे घटनेनंतर फरार झाले होते. नगर पोलीस त्यांचा दीड वर्षांपासून शोध घेत होते. या दोघांचा शोध घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना संदीप वराळ खुनातील फरार आरोपी पुणे जिल्ह्यातील खडकवासला परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार खडकवासला परिसरात सापळा रचून सुशिल लाहोटी आणि अनिल चव्हाण यांना पुण्यातून ताब्यात घेतले.

ही कारवाई पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस अधिक्षक घनश्याम पाटील, सहाय्यक पोलीस अधिक्षक मनिष कलवानिया यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद गोर्डे, पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश गोसावी, उमेश खेडकर, पोलीस नाईक विशाल अमृते, रविकिरण सोनटक्के, दिपक शिंदे, रविंद्र कर्डिले, योगेश सातपुते, दत्तात्रय गव्हाणे, विजय ठोंबरे, मनोज गोसावी, दिगंबर कारखेले, मल्लिकार्जुन बनकर, रावसाहेब हुसळे, सचिन अडबल, बाळासाहेब भोपळे यांनी केली.