निर्जला एकादशीला भीमसेन एकादशी म्हणून का संबोधले जाते ? जाणून घ्या महत्त्व

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – संपूर्ण मराठी महिन्यात 24 एकादशी येतात. एखाद्या वर्षी अधिक महिना आल्यास दोन एकादशी यात जोडल्या जाऊन त्या वर्षी 26 एकादशी येतात. 2020 या वर्षात अश्विन महिना अधिक आहे. त्यामुळे मराठी नूतन वर्षात एकूण 26 एकादशी साजऱ्या केल्या जाणार आहेत. ज्येष्ठ महिन्यातील शुद्ध पक्षात येणारी एकादशी निर्जला एकादशी नावाने ओळखली जाते. पुराणानुसार निर्जला एकादशीचे व्रत केल्यास वर्षभरातील सर्व एकादशी व्रतांचे पुण्य मिळते. यंदाच्या वर्षी मंगळवार, 2 जून 2020 रोजी निर्जला एकादशी आहे. या एकादशीला भीमसेन एकादशी असेही म्हटले जाते.

सर्व एकादशी व्रतांचे पुण्य
एकदा महर्षी वेदव्यास पांडवांकडून चार पुरुषार्थ धर्म, अर्थ, काम, मोक्ष प्रदान करणाऱ्या एकादशी व्रताचा संकल्प सोडवून घेत होते. त्यावेळी भीमाने विचारले, पितामह, तुम्ही प्रत्येक पक्षात एका दिवसाचा उपवास सांगितला आहे. मी एक दिवस नव्हे, तर एक वेळही उपाशी राहू शकत नाही. माझ्या पोटातील वृक नावाचा अग्नी शांत ठेवण्यासाठी मला दिवसातून अनेक वेळा जेवावे लागते. या भुकेमुळे मी एकादशी व्रताच्या पुण्यापासून वंचित राहील का ? त्यावर देवव्यास म्हणाले, भीमा, ज्येष्ठ शुक्ल निर्जला एकादशीचे व्रत कर, ते व्रत तुला सर्व एकादशींचे पुण्य प्रदान करेल. हे वृत करण्यास भीम तयार झाला. म्हणून या एकादशीला भीमसेनी एकादशी किंवा पांडव एकादशी असेही म्हणतात.

निर्जला एकादशी पूजाविधी
निर्जला एकादशीचे व्रत आचरणाऱ्यांनी पहाटे नित्यकर्म आटपल्यानंतर श्रीविष्णूंच्या पूजनाचा संकल्प करावा. श्रीविष्णूंचे आवाहन करुन त्यांची स्थापना करावी. श्रीविष्णूंना पंचामृताचा नैवाद्य दाखवावा. अभिषेक करावा. अभिषेक झाल्यानंतर गंध, अक्षता, तुळशीची पाने, ऋतुकालोद्भव फुले, फळे अर्पण करावीत. यानंतर धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून श्रीविष्णूंची आरती करावी. मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे. शक्य असल्यास विष्णू सहस्त्रनामाचे पठण करावे. यथाशक्ती दान करावे. तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा.

जलकलशाचे दान
ग्रंथानुसार या दिवशी विधिपूर्वक जलकलशाचे दान केल्यास, वर्षभरातील एकादशी व्रताचे पुण्य लाभते. इतर 23 एकादशींना अन्नसेवन झाल्यास, तो दोष दूर होतो. अशा प्रकारे एकादशी व्रत करणारा सर्व पापातून मुक्त होऊन मोक्षास पात्र ठरतो.

निर्जला एकादशी – 2 जून 2020
एकादशी प्रारंभ – 1 जून 2020 रोजी दुपारी 2 वाजून 58 मिनिटे
एकादशी समाप्त – 2 जून 2020 रोजी दुपारी 12 वाजून 04 मिनिटे
भारतीय पंचागानुसार, सुर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन पंरपरा असल्याने निर्जला एकादशीचे व्रत मंगळवार 2 जून 2020 रोजी आचरावे.