…पण गणपतीच्या मूर्तीही आपल्याला चीनमधून आणाव्या लागतात

पोलिसनामा ऑनलाईन टीम – आर्थिक प्रगतीसाठी काही गोष्टी आयात करण्यात काहीच चूक नसल्याचे मत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केले आहे. उद्योग धंद्यांसाठी भारतामध्ये उपलब्ध नसलेल्या कच्च्या मालाची आयात करण्यात काहीच गैर नाही. मात्र त्याचवेळी त्यांनी गणपतीच्या मूर्तीही चीनमधून आयात कराव्या लागत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. तामिळनाडूमधील भाजपा कार्यकर्त्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला.

भारतामध्ये निर्माण होणार्‍या गोष्टींचे उत्पादन वाढत असेल आणि रोजगार निर्मिती होत असेल अशा उद्योंगांसाठी वस्तू आयात करण्यात काहीच गैर नाही. अशा पद्धतीची आयात नक्कीच झाली पाहिजे. मात्र त्याचवेळी रोजगार वाढण्यास मदत न करणार्‍या आणि आर्थिक वाढीला हातभर न लावणार्‍या आयातीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला काहीच फायदा होत नाही.

भारतला आत्मनिर्भर बननण्यात अशा गोष्टींचा हातभार लागत नाही, असे मत सीतारामन यांनी व्यक्त केले आहे. दरवर्षी गणेश चतुर्थीला अनेकजण स्थानिक मुर्तीकारांकडूनच पारंपारिक पद्धतीच्या गणेश मुर्ती विकत घेतात. मात्र आज या मुर्ती ही चीनमधून आयात केल्या जात आहे. ही परिस्थिती का निर्माण झाली. आपण भारतामध्ये गणेश मुर्ती निर्माण करु शकत नाही का?, याचा विचार करणे गरजेचे आहे असेही सीतारामन यांनी म्हटले आहे.

साबणाचे डब्बे, प्लॅस्टीकच्या वस्तू, आगरबत्त्यांसारख्या घरगुती वापरच्या वस्तूंची भारतामध्ये लघू तसेच मध्यम स्तरावरील उद्योजकांच्या माध्यमातून निर्मिती केली जाते. असे असतानाही या वस्तू चीनमधून आयात केल्या जातात. त्याचा भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी काहीच उपयोग होत नाही. त्यामुळेच अशा वस्तूंची आयात करु नये.