उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निर्सग चक्रीवादळाबाबत ‘केले’ हे आवाहन

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   अरबी समुद्रात निर्माण झालेले निसर्ग चक्रीवादळ आज दुपारपर्यंत महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरील अलिबाग, पालघर परिसरात धडकण्याची शक्यत आहे. त्यापार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह किनारपट्टीवरील नागरिकांनी घरातच किंवा सुरक्षित ठिकाणी आसरा घेऊन थांबावे. वादळाचा जोर ओसरेपर्यंत बाहेर पडण्याचा प्रयत्न करु नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

चक्रीवादळापासून जिवितहानी, वित्तहानी होऊ नये म्हणून प्रशासनाने संपूर्ण दक्षता घेतली आहे. आवश्यकतेनुसार नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. लाईफगार्ड, पोलिस, अग्निशमन दल, एनडीआरएफचे जवान सज्ज आहेत. आरोग्य यंत्रणा, स्थानिक प्रशासनही दक्ष आहे. राज्याची संपूर्ण तयारी असून आवश्यकतेनुसार तात्काळ मदत उपलब्ध करण्याचे नियोजन झाले आहे. या वादळाचा वेग आणि ताकद मोठी असल्याने नागरिकांनी सावध, सुरक्षित रहावे प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे पवार म्हणाले. दरम्यान, अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे मंगळवारी दुपारी चक्रीवादळात रुपांतर झाले. बुधवार सकाळपर्यंत त्याचे रूपांतर तीव्र चक्रीवादळात होण्याची शक्यता असून, दुपारी ते दमण आणि हरिहरेश्वरच्या दरम्यान अलिबागजवळ धडकण्याची भीती आहे. यामुळे संपूर्ण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.