‘निसर्ग’मुळे रायगडमध्ये 5 लाखाहून अधिक घरांचे नुकसान : पालकमंत्री आदिती तटकरे

पोलिसनामा ऑनलाईन टीम – चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे रायगड जिल्ह्यातील 5 लाखहून अधिक घरांचे नुकसान झाले आहे. रस्ता वाहतुक सुरळीत करण्यात यश आले असले तरी ग्रामिण भागातील विद्यूत पुरवठा पुर्ववत करण्यासाठी किमान सात ते आठ दिवस लागतील अशी माहिती रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

चक्रीवादळाचा जिल्ह्यातील 12 तालुकांना तडखा बसल्यामुळे नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरु झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यातील 5 लाख हून अधिक घरांचे वादळामुळे नुकसान झाले आहे. तर 5 हजारहून अधिक हेक्टरवरील फळबागांचे नुकसान झाले आहे. वादळामुळे खंडीत झालेली रस्ते वाहतूक पुर्ववत करण्यात यश आले आहे. मात्र विद्यूत पुरवठा आणि दुरसंचार यंत्रणा खंडीत आहे. शहरी भागातील वीज पुरवठा पुर्ववत करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.

मात्र ग्रामिण भागातील वीज पुरवठा पुर्ववत करण्यासाठी सात ते आठ दिवसांचा कालावधी लागू शकतो. त्यासाठी मनुष्यबळाची गरज आहे. राज्याच्या उर्जा विभागाकडे त्यासाठी मागणी करण्यात आली असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले. श्रीवर्धन, माणगाव, रोहा, मुरुड, अलिबाग तालुक्यांना वादळाचा मोठा फटका बसला आहे.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आज रायगड मध्ये येऊन परिस्थितीचा आढावा घेणार आहे. नुकसाग्रस्त भागासाठी विशेष पॅकेज दिले जावे यासाठी प्रयत्न राहील. शासनाच्या सद्य नियमांच्या पलीकडे जाऊन नागरीकांना मदत केली जावी अशी विनंती त्यांच्याकडे केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.