निशका देणार १२ वी ची परीक्षा आयपॅडवर 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यभरात उद्यापासून १२ वी च्या परीक्षांना सुरुवात होणार आहे. मुंबईतल्या सोफिया महाविद्यालयाच्या एका विद्यार्थिनीला बारावीची परीक्षा आयपॅडवर देण्याची परवानगी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाने दिली आहे. निशका नरेश हसनगडी असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. ही विद्यार्थिनी दिव्यांग अध्ययन अक्षम असल्यामुळे तिला आयपॅडवर परीक्षा देण्यास परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान अशा प्रकारे पहिल्यांदाच कोणी विद्यार्थी १२ वी परीक्षा देणार. असे सांगण्यात येत आहे.

लेखनीक करणार सहाय्य
मुंबईतील सोफिया महाविद्यालयातील विद्यार्थिनी निशका हसनगडी ही (दिव्यांग) अध्ययन अक्षम आहे. निकशाला लहानपणापासून इतर विद्यार्थ्यांप्रमाणे हातात पेन पेन्सिल घेऊन लिहता येत नाही. त्यामुळे तिच्यावतीने आयपॅडवर परीक्षा देण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. शिक्षण बोर्डाने या मागणीला मान्यता दिली असून एक लेखनीक आयपॅडवर टाइप केलेले उत्तर उतरपत्रिकेवर लिहणार आहे.

१४ लाख ९१ हजार ३०६ विद्यार्थ्यांची नोंदणी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ मंडळांमार्फत बारावीच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. २१ फेब्रुवारी ते २० मार्च २०१९ या कालावधीत परीक्षा होणार आहेत. या परीक्षेसाठी राज्यभरातून १४ लाख ९१ हजार ३०६ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. यामध्ये ८ लाख ४२ हजार ९१९ विद्यार्थी तर ६ लाख ४८,१५१ विद्यार्थिनी परीक्षा देणार आहेत. कला, वाणिज्य, विज्ञान व किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम या सर्व विभागाचे विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. राज्यात २९५७ परीक्षा केंद्रे आहेत. यावर्षी सर्व विभागात विद्यार्थ्यांना ऑनलाईन हॉलतिकीट मिळणार आहेत. तसेच पीसीएमबी अर्थात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित या विषयांच्या प्रश्नपत्रिकांच्या आराखड्यात बदल करण्यात आला आहे.