आदित्य ठाकरेंनी मैत्रीचा हात पुढे केला तर ? नितेश राणेंनी दिलं ‘हे’ उत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी जर भविष्यात मैत्रीचा हात पुढे केला तर, ते कशासाठी मैत्री करू पाहत आहेत याचं कारण आधी समजून घेईन आणि मगच त्यावर विचार करून हात पुढे करेल असे वक्तव्य काँग्रेस आमदार आणि स्वाभिमान संघटनेचे नेते नितेश राणे यांनी केले आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी बोलताना नितेश राणे यांना आदित्य ठाकरेंनी मैत्रीचा हात पुढे केला तर काय कराल ? असा प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी आपलं मत व्यक्त केलं.

रणजितसिंह आणि सुजय यांच्या भाजपा प्रवेशाबद्दल नितेश म्हणतात…

गेल्या काही दिवसांमध्ये तरुण नेतृत्त्व भाजपमध्ये प्रवेश करत आहेत त्यावरही नितेश राणे यांनी आपलं मत मांडलं आहे. याविषयी बोलताना राणे यांनी रणजितसिंह मोहिते पाटील आणि डॉ. सुजय विखे पाटील यांच्या भाजपा प्रवेशाचे समर्थन केले. नितेश राणे म्हणाले, “जनतेला कामे झालेली हवी असतात, जनतेच्या प्रश्नांना आमदार-खासदारांना उत्तरे द्यावी लागतात, जनतेच्या हितासाठी कोणता निर्णय घ्यायचा असेल तर त्या लोकप्रतिनिधीला घ्यावी लागतात, मतदारसंघात विकासकामे करण्यासाठी निधी लागतो. जनतेला त्यांची कामे झालेली बघायची असतात त्यामुळे रणजितसिंह पाटील यांनी कालच्या भाषणात जनतेसमोर जे मुद्दे मांडले ते योग्य होते. जनतेला विचारुनच त्यांनी भाजपा प्रवेशाचा निर्णय घेतला आहे.”

मग सुजय विखे यांनी खासदारकीची संधी का सोडावी ?

दरम्यान, डॉ. सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशावर बोलताना नितेश राणे म्हणाले की, “आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सुजय विखे पाटील गेली दोन-तीन वर्षे मतदारसंघात बांधणी करत आहे. काँग्रेसकडून तिकीट मिळेल असं त्यांना वाटत होते. मात्र, काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी मिळाली नाही. मग सुजय विखे यांनी खासदारकीची संधी का सोडावी ? असा प्रश्न उपस्थित होतो” असे नितेश राणे म्हणाले.

नारायण राणे काँग्रेस कमिटीत असते तर सुजय विखेंनी काँग्रेसमधून निवडणूक लवली असती

पुढे बोलताना नितेश राणे म्हणाले की, “पक्ष वाढविण्याच्या दृष्टीकोनातून काँग्रेस नेतृत्वाकडून प्रयत्न होणं गरजेचे होतं. सुजय यांना काँग्रेस पक्षाचे तिकीट मिळवून देणं काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचे काम होते. नारायण राणे काँग्रेस कमिटीत असते तर सुजय विखेंनी काँग्रेसमधून निवडणूक लढवली असती हे ठामपणे सांगतो. विरोधी पक्षनेत्याच्या मुलाला तिकीट मिळत नसेल तर हे काँग्रेसच्या प्रदेश नेतृत्त्वाचं मोठं अपयश आहे” असा आरोपही नितेश राणेंनी यावेळी बोलताना केला.