नाणार प्रकल्पावरून भाजप आमदाराने दिले CM ठाकरेंना ‘आव्हान’

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेची भूमिका न मांडता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून रिफायनरीबाबत सरकारची भूमिका स्पष्ट करावी, असे आव्हान भाजप आमदार नितेश राणे यांनी दिले आहे. नाणार रिफायनरीबाबत आम्ही आमची भूमिका दडवून ठेवण्याचा प्रश्न नसून जी भाजपची भूमिका आहे तीच आमची असल्याचे नितेश राणे यांनी म्हटले आहे.

आंगणेवाडी यात्रेनिमित्त सिंधुदुर्गच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर येणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी किमान विकास कामांवरील स्थगिती तरी उठवावी अशी अपेक्षा निलेश राणे यांनी व्यक्त केली आहे. शिवसेना भाजपसोबत येण्यास उत्सुक असल्यानेच वारंवार मुख्यमंत्री राज्यपालांना भेटत असल्याचा आरोप निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे. निलेश राणे म्हणाले, मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच सिंधुदुर्गमध्ये येत आहेत पण शिवसैनिकांनी त्यांच्या जेवणाचा खर्चही केला नाही.

तो भार प्रशासनावर टाकला आहे. आम्हाला सांगितले असते तर आम्ही त्यांच्यासाठी मच्छी पाठवली असती तीही कमी काट्याची. हा दौरा म्हणजे प्रशासनावर ताण असल्याचा आरोप निलेश राणे यांनी केला आहे. तसेच उद्धव ठाकरे इकडे भरपूर पॅकेज जाहीर करतील पण तिकडे अजित पवार बसले आहेत. ते थोडीत यांना देणार असे म्हणत निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली.