‘या’ कंपनीच्या पुढं ‘कार्यसम्राट’ नितीन गडकरी देखील ‘हतबल’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्रीय परिवहन मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर नितीन गडकरी पाच वर्षांपूर्वी पुण्यात प्रथम आले होते. पुणे ते सातारा या महामार्गाच्या रुंदीकरणाला होत असलेल्या उशिराबद्दल त्यांनी पहिल्याच बैठकीत त्या कंपनीला काळ्या यादीत टाकण्याचा आदेश दिला. त्यानंतर पाच वर्षात राज्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ शी संबंधित सर्व आमदार, खासदारांनी या कंपनीकडून केल्या जात असलेल्या रुंदीकरणाच्या कामाबाबत तक्रारी केल्या.

खेड शिवापूर येथील टोलनाका हलविण्यावरुन आंदोलन झाले. पण, गेल्या ५ वर्षात गडकरी यांनी या विषयावर नंतर चुप्पी साधली आहे. आता तर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी हा टोलनाका बंद करण्याची शिफारस केली असतानाही आजही तो टोलनाका सुरु आहे. धडाडीने काम करणारे म्हणून देशभर नावाजले गेलेले केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी सातारा रोडचे रुंदीकरण करणाऱ्या कंपनीसमोर मात्र हतबल झाले आहेत. पाच वर्षापूर्वी त्यांनीच दिलेला आदेशाला त्यांच्याच मंत्रालयाने हरताळ फासला. पण, त्यावर नितीन गडकरी काहीही करु शकले नाही. कारण त्या कंपनीचे नाव आहे़ रिलायन्स इन्फाट्रक्चर.

या नावावरुनच देशभर दबदबा असलेल्या नितीन गडकरी हे का काही करु शकले नाहीत, याचा सर्वाना प्रत्यय आला असेल. मोदी सरकारमधील सर्वाधिक कार्यक्षम मंत्री म्हणून नितीन गडकरी यांचा गौरव खुद्ध काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही लोकसभेत केला आहे. देशातील रस्त्यांचे जाळे अधिक भक्कम करण्याच्या कामाला त्यांनी मोठी चालना दिली. असे असले तरी पुणे -सातारा या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाबाबत त्यांनी वेळोवेळी कंत्राटदाराच्या बाजूने घेतलेली भूमिका अनाकलनीय आहे.

पुण्यातील एका कार्यक्रमात गडकरी यांनी या कंपनीची बाजू उचलून धरत जून २०१८ मध्ये सांगितले होते की, केवळ १२ किमीचे काम बाकी आहे. ते डिसेंबर २०१८ रोजी पूर्ण होईल. आज डिसेंबर २०१९ संपून गेले २०२० साल सुरु झाले तरी हे काम अपूर्ण आहे. वेळेपूर्वी काम केले तर बोनस आणि ठरविलेल्या वेळापेक्षा अधिक काळ लागला तर दंड अशी योजना गडकरी यांच्या परिवहन मंत्रालयाकडून संपूर्ण देशभर राबविली जात आहे. मात्र, त्याला सातारा रोड अपवाद करण्यात आला की काय अशी शंका अनेक मान्यवरांनी व्यक्त केली आहे.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी गडकरी यांच्या राष्ट्रीय परिवहन मंत्रालयाला सातारा रोडवरील खेड शिवापूर येथील टोलनाका बंद करण्याची शिफारस केली आहे. या कंत्राटदाराने अनेक शर्तीचे पालन केलेले नाही. अनेकदा मुदतवाढ दिल्यानंतरही रुंदीकरणाची कामे अपूर्ण आहे. या रस्त्याचे वेळेवर डांबरीकरण झालेले नाही. त्यामुळे रस्त्यावर जागो जागी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना भयंकर त्रास होत आहे. टोलनाक्यावर कायम मोठ्या प्रमाणावर रांगा लागलेल्या असतात. स्थानिक वाहनचालकांना या टोलनाक्यावर टोलमाफी देण्याचे धोरण असताना त्याची येथे अंमलबजावणी केली जात नाही. अशा विविध कारणामुळे हा टोलनाका बंद करावा अशी शिफारस करण्यात आली आहे.

असे असतानाही ५ वर्षापूर्वी ज्या कंपनीला गडकरी काळ्या यादीत टाकायला निघाले होते, त्याच कंपनीविषयी आता ते म्हणत आहे की, जिल्हाधिकाऱ्यांनी सविस्तर अहवाल पाठविला आहे. त्याचा रिर्व्ह मी घेत आहे. मी त्यांना काम लवकरात लवकर पूर्ण करण्यास सांगितले आहे. आणि ते लवकरात लवकर पूर्ण केले जाईल. संपूर्ण देशभर धडाडीने काम करणारे आणि कोणाचीही भिडस्त न बाळगता बोलणारे म्हणून प्रसिद्ध असणारे नितीन गडकरी या कंपनीपुढे मात्र हतबळ झाले असल्याचे गेल्या ५ वर्षात दिसून आले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/