‘ते’ प्रकल्प म्‍हणजे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पापांची स्मारके : नितीन गडकरी

विटा : पोलीसनामा ऑनलाईन – सांगलीतील विटा येथे आज (रविवार) भाजपच्या वतिने प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बोलताना सिंचन प्रकल्पावरून काँग्रेस – राष्ट्रवादी वर हल्लाबोल केला. ‘महाराष्ट्रात खूप सिंचन योजना आहेत, परंतु हे प्रकल्प म्‍हणजे आघाडी सरकारच्या काळात काँग्रेस – राष्ट्रवादीच्या पापांची स्मारके बनली होती’.असे गडकरी म्हणाले. भाजप उमेदवार संजयकाका यांच्या प्रचारार्थ विटा येथे आयोजित जाहीर सभेत बोलत होते.

यावेळी बोलताना गडकरी यांनी स्वाभिमानी पक्षाचे नेते आणि विद्यमान खासदार राजू शेट्टी यांच्यावर देखील टीका केली ते म्हणाले,’राजू शेट्टी हे प्रश्न समजून न घेता आंदोलन करतात. तर काँग्रेस पक्षाने देशात जातीयवाद पेरला आहे. अशा परिस्थितीत समाजाला नवीन दिशा देण्यासाठी भाजपला साथ देण्याचे आवाहन यावेळी गडकरी यांनी केले. त्‍याचबरोबर देशात आदर्श खेडी आणि आदर्श शहरे आपण निर्माण करू, असे प्रतिपादन नितीन गडकरी यांनी यावेळी केले.

यावेळी चंद्रकांत पाटील, सदा भाऊ खोत, आमदार अनिल बाबर, अमोल बाबर, सुहास बाबर, माजी आमदार भगवानराव साळुंखे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय विभूते, राजाराम गरुड, तानाजी पाटील, अमोल मोरे, मनीषा बागल, विनोद गुळवणी, शंकर मोहिते, अनिल म.बाबर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.