नितीन गडकरी रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून येतील : फडणवीस

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्याच्या लोकसभा निवडणूकीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज सोमवारी शेवटचा दिवस होता. नागपुरातून नितीन गडकरी यांनी आज लोकसभा निवडणूकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नितीन गडकरी हे रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून जिंकतील असा विश्वास व्यक्त केला आहे.

नितीन गडकरी यांचे राहत्या घरी औक्षण झाल्यानंतर गडकरी लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघाले. त्यांच्या घरापासून एका रथामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी विराजमान झाले होते. त्यानंतर नितीन गडकरी यांनी संविधान चौकात बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घातला त्यानंतर गडकरी हे अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले.

नितीन गडकरी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी लाखोंच्या संख्येने कार्यकर्त्ये उपस्थित असल्याने नागपूरचे रस्ते भगवे झाले होते. सर्व कार्यकर्ते एकच नारा देत होते. तो म्हणजे ‘हम भी चौकीदार’. माध्यमांच्या प्रतिनिधींना बोलताना गडकरी म्हणाले की, नागपूरचे लोक माझ्यावर अफाट प्रेम करतात म्हणून मी लोकसभा निवडणूक गेल्या वेळेच्या पेक्षा अधिक मताधिक्याने जिंकेल. तर देवेंद्र फडणवीस यांनी देखील गडकरी महाराष्ट्रातील विजयाचे रेकॉर्ड ब्रेक करतील असा अंदाज व्यक्त केला आहे. त्याचप्रमाणे सेना-भाजप हे महाराष्ट्रात ४५ जागा जिंकतील असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.