नितीन गडकरींनी दिली २०० वर्षांची गॅरेंटी

अयोध्या : पोलीसनामा ऑनलाईन – पावसाळ्याच्या अगोदर केलेले रस्ते पाऊस सुरु होताच त्यावर खड्डे पडतात. पावसाळ्यात कोकणात जाणाऱ्या कोकणी माणूस मुंबई-गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्याने दरवर्षी वैतागतो. महसुल मंत्री दरवर्षी गणपतीपूर्वी या महामार्गावरील खड्डे बुजविण्यात येतील, असे आश्वासन दरवर्षी देतात.

मुंबईतील रस्त्यावरील खड्डे तर नेहमीच गाजत असतात. अशी परिस्थिती असताना केंद्रीय भूपृष्ट वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मोदी सरकारच्या काळात म्हणजेच त्यांच्या काळात तयार करण्यात आलेल्या रस्त्यांची तब्बल २०० वर्षांची गॅरेंटी दिली आहे. या रस्त्यांवर पुढील २०० वर्षे खड्डे पडणार नाही, असा दावा त्यांनी केला आहे. रस्ते तयार करताना आम्ही गुणवत्तेसोबत, कंत्राटदारांसोबत कोणतीही तडजोड करणार नाही. त्यामुळे मोदींच्या सत्ताकाळात तयार झालेले रस्ते दीर्घकाळ टिकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जे काम गेल्या ७० वर्षांमध्ये झाले नाही, ते आम्ही ५ वर्षांमध्ये केले, असं म्हणत त्यांनी काँग्रेसला अप्रत्यक्ष टोला लगावला. अयोध्येत पाच प्रकल्पांच्या भूमीपूजनानंतर ते बोलत होते.

नितीन गडकरींनी शुक्रवारी पाच प्रकल्पांचे भूमीपूजन केले. हा कार्यक्रम जीआयसी मैदानावर आयोजित करण्यात आला होता. ‘उत्तर प्रदेशचा चेहरामोहरा बदलत आहे. रस्ते सिमेंट आणि काँक्रिटचे रस्ते तयार होत आहेत. या रस्त्यांवर २००वर्षे खड्डे पडणार नाहीत. कारण आम्ही दर्जाशी कोणतीही तडजोड करणार नाही,’ असं गडकरी म्हणाले. ‘अयोध्या प्रभू रामाची नगरी आहे. गेल्या दौऱ्यात ज्या प्रकल्पांची मी घोषणा केली, त्यांचे काम सुरू करण्यासाठी मी आलो आहे. आता ज्या प्रकल्पांचे भूमीपूजन झाले आहे, त्यावर पुढील दोन महिन्यात वेगाने काम सुरू होईल,’ असंदेखील त्यांनी सांगितलं.

अयोध्येत विविध प्रकल्पांचं भूमीपूजन करणाऱ्या नितीन गडकरींनी राम मंदिरावर बोलणे टाळलं. त्यांनी फक्त विकासकामांवर भाष्य केले. ‘अयोध्या छावणी ते मनकापूर गोंडापर्यंत ७० किलोमीटरपर्यंत राष्ट्रीय महामार्ग तयार करण्यात येईल. याचा आराखडा तयार करण्याचा आदेश देण्यात आला आहे. याशिवाय अयोध्येतील पाच नाल्यांची एसटीपीच्या मदतीने सफाई करण्यात येईल,’ असं गडकरी म्हणाले.