उद्घाटनावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अधिकार्‍यांवर संतापले, म्हणाले – ‘तुमचं अभिनंदन करताना मला लाज वाटतेय’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी ( Nitin Gadkari) यांनी आज अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. गडकरी यांच्या हस्ते आज केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन झालं. या उद्घाटन सोहळ्यावेळी नितीन गडकरी कामचुकार अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले. इमारतीच्या उभारणीला झालेल्या विलंबाबद्दल गडकरी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सर्वांनाच फैलावर घेतलं. यावेळी या उदघाटन कार्यक्रमात त्यांनी मंत्र्यांना फैलावर घेत कोणतंही काम पूर्ण झाल्यानंतर उद्घाटनाचा कार्यक्रम होतो. त्यात काम पूर्ण करणाऱ्यांचं कौतुक, अभिनंदन केलं जातं. पण तुमचं अभिनंदन करताना मला संकोच वाटतो, असं नितीन गडकरी म्हणाले. ‘अशा पद्धतीची इमारत उभारण्यात येणार असल्याचं २००८ मध्ये निश्चित झालं होतं.

२०११ मध्ये त्यासाठीची निविदा निघाली आणि हे दोनशे अडीचशे कोटींचं काम नऊ वर्षांनंतर आज पूर्ण झालं. हे काम पूर्ण होण्यासाठी लागलेल्या वेळेत तीन सरकारं आणि आठ अध्यक्ष होऊन गेले. त्यानंतर आज हे काम पूर्ण झालं आहे,’ अशा शब्दांत गडकरींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्याचबरोबर त्यांनी अधिकाऱ्यांना टोला लगावत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सध्याच्या अध्यक्षांचा याच्याशी काही संबंध नाही. पण ज्या महान लोकांनी २०११ पासून २०२० पर्यंत हे काम केलं, त्यांचे फोटो या कार्यालयात लावण्याचा प्रयत्न करा, असेदेखील गडकरी यावेळी म्हणाले.यावेळी त्यांनी मुंबई आणि आग्रा हायवेच्या कामाचे देखील उदाहरण दिले. त्यांनी यावेळी त्याचे उदाहरण देत म्हटले कि, १ लाख कोटी रूपयांच्या निधीतून तयार करण्यात येणारा दिल्ली-मुंबई महामार्ग ( Mumbai delhi Highway) तीन वर्षात पूर्ण करणार असल्याचं आपण अभिमानानं सांगत आहोत.

इतका मोठा महामार्ग तीन साडेतीन वर्षात पूर्ण होणार असेल आणि या दोनशे कोटीच्या कामासाठी आपण दहा वर्ष लावली, तर हे अभिनंदन करण्यासारखं नाही.काही विकृत अधिकाऱ्यांनी लवकर निर्णय न घेता याला वेळ लावला असल्याची टीका देखील त्यांनी यावेळी केली. दरम्यान, अनेक अधीकारी हे १२ ते १३ वर्ष एका पदाला चिकटून असल्याचा टोला देखील त्यांनी लगावला. अनेक अधीकारी हे कामचुकार असल्याची टीका देखील त्यांनी यावेळी केली. या संस्थेचं इतकं नाव आहे, त्यानंतरही आपण अपयशी ठरलेलो आहोत, असं म्हणत गडकरींनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.दरम्यान, आपल्या कारभाराविषयी आणि कामाच्या पद्धतीवर भाष्य करताना गडकरी यांनी,माझं नाव बदनाम झालंच आहे.

रस्त्यांचं काम पूर्ण करण्यापेक्षा कामचुकार अधिकाऱ्यांना हाकलून लावलं. त्यांना सेवामुक्त केलं, हेच माझं उद्दिष्ट आहे. मला मंत्र्यांचे अधिकार माहीत आहेत. माझा स्वभाव संवेदनशील आहे. हे काम पूर्ण होत असताना देशाने तीन सरकारं पाहिली. मग मी तुमचं काय अभिनंदन करू? मला अभिनंदन करायचीही लाज वाटते, अशा शब्दांत गडकरींनी या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.