नागपूर बस खरेदीत गैरव्यवहार; नितीन गडकरींच्या कार्यालयानं दिलं ‘हे’ स्पष्टीकरण

पोलीसनामा ऑनलाइन टीम – नागपूर बस खरेदीत गैरव्यवहार झाल्याचं वृत्त स्वीडीश एसव्हीटी या वृत्तसंस्थेनं दिलं होतं. केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या मुलाची कंपनी यात असल्याचं म्हटलं आहे. स्वीडनमधील बसनिर्मिती करणारी स्कॅनिया कंपनी आणि गडकरींच्या मुलाची कंपनी यांच्यात हा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचं वृत्त समोर आलं आणि यानंतर खळबळ उडाली. स्कॅनिया कंपनीनं केलेल्या चौकशीत हा गैरव्यवहार झाल्याचं समोर आलं. एखादं काम करून घेण्यासाठी लाच किंवा दुसरं काम करून घेतल्याचा हा प्रकार असल्याचंही म्हटलं आहे. अनेक आरोप झाल्यानंतर आता गडकरी यांच्या कार्यालयानं यावर स्पष्टीकरण दिलं आहे. कार्यालयानं सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

गडकरींच्या कार्यालयाकडून देण्यात आलं ‘हे’ स्पष्टीकरण

हे सर्व मीडियानी रंगवलेल्या बातम्या आहेत असं कार्यालयानं म्हटलं आहे. माध्यमांच्या रिपोर्टमध्ये असं म्हटलं आहे की, 2016 च्या नोव्हेंबरमध्ये स्कॅनिया कंपनीची लक्झरी बस भारतात आली. यात गडकरींच्या मुलाचा संबंध असल्याचं सांगितलं आहे. हे आरोप पूर्णपणे चुकीचे आहेत. गडकरी किंवा त्यांच्या कुटुंबीयांचे कोणत्याही प्रकारे बस खरेदीशी देणं-घेणं नाही, असं कार्यालयानं स्पष्ट केलं आहे.

नेमकं प्रकरण काय ?

एसव्हीटीनं म्हटलं आहे की, स्कॅनियानं त्यांच्या कंपनीच्या बस भारतात विकण्यासाठी लाच देऊ केली होती. 2013 ते 2016 या कालावधीत गैरव्यवहार झाला होता. देशातील 7 राज्यांमध्ये या बसेसची विक्री झाली होती. भारतात स्कॅनियानं 2007 मध्ये काम सुरू केलं होतं, तर नंतर पुढील 4 वर्षांत देशात बस तयार करणारा कारखानाही उभारला होता.

‘कामाच्या बदल्यात भारतातील परिवहन मंत्र्याला एक लक्झरी बस भेट दिली’

कामाच्या बदल्यात भारतातील परिवहन मंत्र्याला एक लक्झरी बस भेट दिल्याचं स्कॅनिया कंपनीच्या ऑडिटरला आढळून आलं होतं. याची माहिती स्कॅनियानं त्यांच्या फोक्सवॅगनला कळवली. स्कॅनियाची मूळ मालकी या कंपनीकडे आहे. स्वीडनमध्ये एसव्हीटीसह जर्मन वृत्तसंस्था झेडडीएफनेदेखील याबाबत वृत्त प्रसारित केलं आहे.

‘त्या बदल्यात स्कॅनिया कंपनीच्या काही बसेस भाड्यानं किंवा विकत घेण्यात आल्या’

एसव्हीटीनं म्हटलं आहे की, 2016 मध्ये एक लक्झरी बस स्कॅनिया कंपनीच्या एका डीलरकडून गडकरी यांच्या मुलाच्या कंपनीला देण्यात आली. याच्या बदल्यात स्कॅनिया कंपनीच्या काही बसेस भाड्यानं किंवा विकत घेण्यात आल्या.असंही बोललं जात आहे की, ही बस गडकरींच्या मुलीच्या लग्नावेळी वापरण्यात आली.