हे काय बोलून गेले नितीन गडकरी… एका मुख्यमंत्र्यांचा ड्रायव्हर ‘अंध’ असून देखील गाडी चालवत होता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभेत काल माेटर वाहन संशाेधन विधेयक २०१९ वर चर्चा करण्यात आली. यावेळी केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी अनेक किस्से सांगितले. या चर्चेत त्यांनी सरकारी ड्रायव्हरच्या फिटनेसवर भाष्य केले. यामध्ये त्यांनी स्वतःच्या ड्रायव्हरचा देखील एक किस्सा सांगितला. यावेळी त्यांनी स्वतःचा किस्सा सांगताना म्हटले की, त्यांच्या ड्रायव्हरला मोतीबिंदू झाल्यामुळे एकदा त्यांचा मोठा अपघात झाला होता.

दोन्ही डोळ्यांनी अंध तरीही चालवायचा गाडी

यावेळी त्यांनी आणखी एक किस्सा सांगताना म्हटलं कि, एका मुख्यमंत्र्यांचा ड्रायव्हर हा दोन्ही डोळ्यांनी अंध असून देखील गाडी चालवत असे. यावर एका खासदाराने असे कसे काय विचारले असता त्यांनी म्हटले की, तो आजूबाजूच्या परिस्थितीचा अंदाज घेऊन गाडी चालवत असे. त्याचबरोबर त्यांनी एका स्टंटमॅनचे देखील उदाहरण दिले. तो स्टंटमॅन डोळ्यावर पट्टी बांधून गाडी चालवत असे. त्याचबरोबर स्वतःसोबत घडलेल्या घटनेचा देखील त्यांनी यावेळी उल्लेख केला.

भ्रष्टाचार संपवणार

यावेळी गडकरांनी या विधेयकाद्वारे भ्रष्टाचार संपवण्याची देखील घोषणा केली. त्याचबरोबर या विधेयकात रस्ता सुरक्षा आणि वाहतूक नियमांचे देखील मोठ्या प्रमाणात पालन करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान आणणार असल्याचे म्हटले. याचबरोबर त्यांनी रस्ते अपघातात मृत्यू पावणाऱ्यांच्या संख्येत घट झाली नाही तर ते माझे मोठे अपयश असेल असे देखील म्हटले.