आगामी काळात Electric Vehicles निर्मितीत भारत प्रथम क्रमांकावर असेल; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा विश्वास

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींनी सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. इंधनाच्या रोजच्या दरवाढीचा फटका थेट खिशाला बसत असल्यामुळे सर्वसामान्य हैराण झाले आहेत. त्यामुळे ग्राहकांकडून इलेक्ट्रिक वाहनांना चांगला प्रतिसाद दिला जात आहे. तसेच वाढत्या प्रदुषणाला आळा घालण्यासाठी पर्याय शोधले जात आहेत. या पार्श्वभूमीवर आता इलेक्ट्रिक वाहनांना केंद्राकडून प्रोत्साहन दिले जात आहेत. आगामी 6 महिन्यांमध्ये देशात इलेक्ट्रिक वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या लिथियम-आयन बॅटरीचे उत्पादन सुरू होणार आहे. त्यामुळे आगामी काही काळात भारत इलेक्ट्रिक बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांच्या निर्मितीच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर असेल असा विश्वास केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे.

केंद्रीय मंत्री गडकरी अमेजन संभव संमेलनात बोलत होते. दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून ते सहभागी झाले होते. इलेक्ट्रिक वाहनांद्वारे परिवहन प्रणाली प्रदूषणमुक्त करता येणार आहे. तसेच येत्या 2 वर्षात इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती कमी होतील. तसेच ही वाहने किंमतीच्या बाबतीत पेट्रोल अन् डिझेल वाहनांशी स्पर्धा करतील. भारत वाहन उद्योगक्षेत्रात पहिल्या स्थानावर पाहायचा आहे. यासाठी सरकार इथेनॉल, मिथेनॉल, बायो-सीएनजी, इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रिकसह तत्सम इंधन इंजिन असलेली वाहने तयार करण्यास उत्पादकांना प्रोत्साहन देत असल्याचे गडकरी म्हणाले. भारत इलेक्ट्रिक वाहन निर्मितीच्या क्षेत्रात पुढे जात आहे. सध्या सर्व नामांकित ब्रँड भारतात आहेत. एकापेक्षा जास्त प्रकारच्या इंधनावर चालविण्याची क्षमता असणाऱ्या इंजिनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार वाहन उत्पादकांना प्रोत्साहित करणार असल्याचे गडकरी म्हणाले.