चप्पल, लुंगी घालून वाहन चालवल्यास होणाऱ्या दंडाबाबत नितीन गडकरींचा ‘मोठा’ खुलासा !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नवीन वाहतूक नियम लागू झाल्यानंतर दंडातील रकमेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. याशिवाय चप्पल किंवा लुंगी घालून गाडी चालवल्यास दंड होईल अशा आशयाचे अनेक मेसेज सोशल मीडियावर फिरताना दिसत होते. त्यामुळे जनतेत संभ्रम निर्माण झाला होता. परंतु सोशल मीडियावर फिरत असलेले असे सर्व मेसेज अफवा आहेत अशी प्रतिक्रिया रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. अशा अफवांपासून सावध राहण्याचे आव्हानही त्यांनी केले आहे.

याबाबत नितीन गडकरी यांनी ट्विट करत म्हटले आहे की, “अफवांपासून सावधान. नव्या मोटार वाहन कायद्यात अर्ध्या बाह्यांचे शर्ट घालून वाहन चालवल्यास, लुंगी किंवा बनियान घालून वाहन चालवल्यास दंड करण्याची कोणतीही तरतूद नाही. वाहनांमध्ये अतिरीक्त बल्ब नसल्यास, वाहनाच्या काचा मळालेल्या असल्यास तसेच चप्पल घालून वाहन चालवल्यास दंड आकारण्याची कोणतीही तरतूद नाही.”

1 सप्टेंबर पासून नवीन मोटार वाहन कायदा लागू झाला. या नियमांनुसार, कोणी जर वाहतूक नियम मोडत असेल तर त्यांना भरमसाठ दंड आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे. या नवीन कायद्याच्या अंमलबजावणीनंतर अनेक अफवा समोर येताना दिसल्या. अनेक दिशाभूल करणारी माहितीही समोर येताना दिसली. अशी माहिती आणि अफवा पसरवणाऱ्यांवर गडकरींना शेलक्या शब्दात निशाणा साधला होता. गडकरी म्हणाले होते, “प्रसारमाध्यमातील काही मित्रांनी रस्ते सुरक्षेसारख्या गंभीर विषयाचा विनोद बनवला आहे” असा टोला त्यांनी लगावला होता.