PCMC News : स्थायी समिती सभापतीपदी नितीन लांडगे, राष्ट्रवादीचा उमेदवार पराभूत

पिंपरी: पोलीसनामा ऑनलाईनः पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक शुक्रवारी (दि.5) पार पडली. निवडणुकीत भाजपचे नितीन लांडगे विजयी झाले. तर राष्ट्रवादीच्या प्रवीण भालेकर यांचा पराभव झाला. लांडगे यांना 10 तर भालेकर यांना 5 मते मिळाली. स्थायीवर भाजपचे वर्चस्व असल्याने स्थायी समितीवर भोसरीचे आमदार महेश लांडगे गटाची सरशी झाली आहे.

पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समिती अध्यक्षपदासाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडली. सभापतीपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवीण भालेकर यांनी देखील अर्ज दाखल केला होता. निवडणुकीत नितीन लांडगे  यांना 10 तर भालेकर याना 5 मते पडली. दरम्यान स्थानिक आणि पक्षातील जेष्ठ नेते आणि आमदारांनी अन्याय केल्याने भाजपाचे नगरसेवक रवी लांडगे यांनी स्थायी समिती सदस्यपदाचा राजीनामा दिला होता. निष्ठावान असतानाही पक्षाने अन्याय केल्याने राजीनामा देत आहेत, अशी भूमिका लांडगे यांनी मांडली होती. त्यामुळे आज पार पडलेल्या निवडणुकीला नाराज भाजपचे स्थायी समिती सदस्य रवी लांडगे अनुपस्थित होते.