राज्य काँग्रेसमध्ये फेरबदल ! नितीन राऊत यांचं ऊर्जामंत्रिपद जाणार ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये पक्ष संघटनेत अनेक मोठे फेरबदल पहायला मिळत आहेत. बाळासाहेब थोरात यांनी प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती पक्षाच्या हायकमांड सोनिया गांधी यांच्याकडे केली होती. यानंतर या पदासाठी अनेक नावं चर्चेत होती. यानंतर विधानसभा अध्यक्ष असलेले नाना पटोले यांना राजीनामा द्यायला सांगून त्यांना प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली.

यानंतर आता विधानसभा अध्यक्षपदी कोण विराजमान होणार याची चर्चा सुरू आहे. परंतु त्यापूर्वीच नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे. त्यामुळं पटोले आणि राऊत यांच्यात खांदेपालट होणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असल्याचं दिसत आहे. दरम्यान विधानसभा अध्यक्षपदासाठी पृथ्वीराज चव्हाणांपासून के सी पाडवी यांच्या नावाची चर्चा सुरू होती. यातच आता संग्राम थोपटे हे नवीन नाव पुढं आलं आहे.

विधानसभा अध्यक्षपदासाठी भोर मतदारसंघाचे आमदार संग्राम थोपटे यांच्या नावाची चर्च होत आहे. प्रदेशाध्यक्षपदी विदर्भाला मान दिल्यानंतर आता पश्चिम महाराष्ट्राला अध्यक्षपदाचा मान देऊन समतोल साधण्याचा प्रयत्न काँग्रेस हायकमांडकडून केला जाऊ शकतो. संग्राम थोपटे यांना ठाकरे मंत्रिमंडळात मंत्री केलं नाही म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांनी पुणे काँग्रेस कार्यालयात तोडफोड केल्याची घटना घडली होती. परंतु ते कार्यकर्ते माझे नाहीत असं थोपटेंनी स्पष्ट केलं होतं. मंत्रिपद हुकल्यानं आता त्यांना विधानसभा अध्यक्षपदी संधी देणार का हे पाहणं गरजेचं आहे. एका वृत्तवाहिनीनं याबाबत वृत्त दिलं आहे.

आता काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांना संधी देण्यात आली आहे. परंतु पटोले फक्त प्रदेशाध्यक्षपद सांभाळतील की त्यांना मंत्रिपदही मिळणार आहे हे आगामी काळात कळेल. तुर्तास मात्र नितीन राऊत यांचं खातं नाना पटोलेंना मिळेल आणि राऊत यांना अध्यक्षपद दिलं जाईल असंही सांगितलं जात आहे. परंतु नितीन राऊत मंत्रिपद सोडतील का ? याबाबत मात्र प्रश्नचिन्ह कायम आहे.