चीन प्रश्नावरून शरद पवारांना आणखी एका काँग्रेस नेत्याचा सणसणीत टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या वक्तव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये वाद सुरु झाले आहेत. काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही शरद पवारांच्या वक्तव्यावर मोठं विधान केलं होत. आता ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनीही यात वादात उडी घेतली आहे.

आज झालेल्या एका पत्रकार परिषदेत नितीन राऊत म्हणाले की, यशवंतराव चव्हाण हे संरक्षण मंत्री होते तेव्हा इंदिराजींनी 1971 चं युद्ध जिंकलं होतं, पण हे पवारांना आठवलं असते तर बरं झालं असतं. पवार हे काँग्रेसमध्ये तयार झालेलं नेतृत्व आहे. त्यांच्या मनात काँग्रेसबद्दल आपुलकी आहे, पण मग राहुल गांधींबद्दल ते अस कोणत्या संदर्भात बोलले याबाबत माहिती नाही. खरं तर पवार यांनी नरेंद्र मोदींना प्रसार माध्यमांना सामोरं जाण्याचा सल्ला द्यायला हवा होता.

नितीन राऊत पुढे म्हणाले, पवार साहेबांनी विसरायला नको की 1962 च्या युद्धावेळी असलेली परिस्थिती वेगळी होती, देश शस्त्र सज्ज होता. मात्र आता परिस्थिती वेगळी आहे. ते संरक्षण मंत्री असताना त्यांनी काही चुका दुरुस्त केल्या असत्या तर बरं झालं असतं, असं म्हणत नितीन राऊत यांनी शरद पवारांवर निशाणा साधला.

तत्पूर्वी भारत आणि चीन सीमा रेषेवरील तणावपूर्ण वादावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणी कुणी राजकारण करू नये, असा सल्ला दिला होता. त्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले होते.