93 व्या अ. भा. साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी तावडे तर कार्यवाह म्हणून केसकरांची निवड, कार्यकारिणी जाहीर

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – उस्मानाबाद येथे जानेवारी 2020 मध्ये होऊ घातलेल्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी मराठवाडा साहित्य परिषदेच्या उस्मानाबाद शाखेचे अध्यक्ष नितीन तावडे यांची निवड करण्यात आली आहे. तर संमेलनाच्या प्रमुख कार्यवाहपदी रवींद्र केसकर, कोषाध्यक्षपदासाठी माधव इंगळे यांच्या नावावर सर्वानुमते मोहर उमटविण्यात आली.

आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागत मंडळाची कार्यकारिणी जाहीर करण्यासाठी रविवारी दुपारी 3 वाजता संमेलनाच्या संपर्क कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. स्वागत समिती सदस्यांच्या बैठकीत शिक्षणमहर्षी एम. डी. देशमुख यांनी स्वागताध्यक्ष पदासाठी नितीन तावडे, कार्यवाह रवींद्र केसकर आणि कोषाध्यक्षपदासाठी माधव इंगळे यांच्या नावाचा प्रस्ताव सर्वांसमोर ठेवला. ज्येष्ठ लेखिका तथा 7 व्या मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्ष कमलताई नलावडे यांनी या प्रस्तावास अनुमोदन दिले. कार्यक्रमास उपस्थित असलेले माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील यांनीही प्रस्तावाची पाठराखण करीत एकमताने पदाधिकारी निवडीस समर्थन दिले.

आगामी साहित्य संमेलनाच्या यशस्वीतेसाठी स्वागत मंडळाच्या कार्यकारिणीत पुढील सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्वागताध्यक्ष नितीन तावडे, कार्यवाह रवींद्र केसकर, कोषाध्यक्ष माधव इंगळे, कार्यकारिणी सदस्य प्राचार्य डॉ. अनार साळुंके, प्राचार्य डॉ. सुलभा देशमुख, मीनाताई महामुनी, ज्येष्ठ कथाकार जयराज खुने, इलीयास पिरजादे, युवराज नळे, आशिष मोदाणी, राजेंद्र अत्रे, बालाजी तांबे, डॉ. अभय शहापूरकर, अग्निवेश शिंदे, श्रीकांत साखरे यांचा समावेश आहे. बैठकीस मराठवाडा साहित्य परिषदेच्या पदाधिकार्‍यांसह विविध संस्था, संघटनांचे स्वागत मंडळाचे सभासद असलेले प्रतिनिधी उपस्थित होते.