‘रामायण’, ‘महाभारत’नंतर आता DD कडून ‘विष्णु पुराणा’ची पर्वणी, 14 मेला संध्या. 7 पासून सुरू

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था  –   लॉकडाउनमुळे जुन्या पण प्रेक्षकांच्या मनांवर कोरल्या गेलेल्या टीव्ही मालिका पुन्हा सुरू झाल्या. रामायण मालिकेने आजच्या युगातही सर्वाधिक व्ह्यूवरशिप मिळवली म्हणजे जगात सर्वाधिक पाहिली गेलेली मालिका ठरली. त्यानंतर सुरू झालेल्या महाभारत मालिकेलाही उत्तम प्रतिसाद मिळाला. या मालिकांची लोकप्रियता पाहून भगवान विष्णुंच्या जीवनावर आधारित विष्णु पुराण या मालिकेचे पुन: प्रक्षेपण करण्याचा निर्णय दूरदर्शनने घेतला आहे. 14 मेला रात्री 7 वाजता डीडी भारती या चॅनेलवरून विष्णु पुराण या मालिकेचं पुन:प्रक्षेपण होणार आहे.

रवी चोप्रा यांनी ही मालिका दिग्दर्शित केली असून ती 23 जानेवारी 2000 ला पहिल्यांदा टीव्हीवरून प्रसारित झाली होती. या मालिकेचे 126 भाग असून, त्यामध्ये श्रीविष्णुंच्या विविध अवताारांतील कथा नाट्यस्वरूपात प्रेक्षकांना पहायला मिळणार आहेत. बी. आर.चोप्रा निर्मित महाभारत मालिकेत श्रीकृष्णाची भूमिका केलेले मराठी अभिनेते नितीश भारद्वाज यांनीच विष्णुपुराणात मुख्य भूमिका साकारली आहे. त्यामुळे सर्व प्रेक्षक ही मालिका पाहण्यासाठी उत्सुक आहेत.