‘शिव्या कशा द्यायच्या याची संस्था सीएम नितीशकुमार चालवतात’

नवी दिल्‍ली : वृत्तसंस्था – शिव्या कशा द्यायच्या आणि कारणे कशी शोधायची याची संस्था सीएम नितीशकुमार चालवतात अशी खोचक टीका बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी केली आहे. बिहारमधील भाजप मंत्री विनोद नारायण झा यांनी प्रियांका गांधी यांच्‍या राजकीय प्रवेशावरुन एक वादग्रस्‍त वक्‍तव्‍य केले. त्‍यामुळे ते चांगलेच चर्चेत आले आहेत. मुख्य म्हणजे त्यांच्या या वक्तव्यामुळे आता भाजप आणि काँग्रेस नेत्यांमध्ये वाकयुद्ध सुरू झाल्याचे दिसत आहे. झा यांच्‍या वक्तव्यावर बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनीही बोचरी प्रतिक्रिया दिली आहे.

प्रियांका गांधी राजकारणात प्रवेश केल्यानंतर त्यांच्यावर अनेकांनी आपापल्या प्रतिक्रिया देत आपल्या भावना मांडल्या आहेत. काहींनी त्यांच्या या निर्णयाचे स्वागत केले तर काहींनी यावर खोचक टीकाही केली. कोणी त्यांना सुंदर चेहर्‍यावर मते मागता येत नाही असा टोला लगावत आहे. तर कोणी  प्रियांका यांना काँग्रेसचा हुकमी एक्‍का अशी पदवी देत आहे. असे असले तरी  प्रियांका गांधी यांच्‍या राजकीय प्रवेशावरुन देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे शिवाय  देशातील राजकीय हालचालींना वेग आल्याचेही दिसत आहे.

दरम्यान प्रियांका गांधी यांच्यावर टीका करताना बिहारचे भाजप मंत्री विनोद नारायण झा म्हणाले की, “काँग्रेसला समजण्‍याची गरज आहे की, सुंदर चेहर्‍यावर मते मिळत नसतात. तसेच त्‍या रॉबर्ट वधेरा यांची पत्‍नी आहेत, ज्‍यांच्‍यावर जमीन घोटाळा आणि भ्रष्‍टाचाराचे आरोप आहेत. त्‍या खूप सुंदर आहेत मात्र त्‍यांना राजकारणाची माहिती नाही” अशा पद्धतीचे वादग्रस्‍त वक्‍तव्‍य त्यांनी केले.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रियांका गांधी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वाराणसी येथून निवडणूक रिंगणात उतरवले जाणार असल्याची अटकळ बांधली जात आहे. उत्तर प्रदेशमधील पूर्वांचल भागावर काँग्रेसने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. शिवाय पूर्वांचल हा भाजपचा बालेकिल्ला आहे. यामुळे भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेसने पूर्वांचलची जबाबदारी प्रियांका गांधी यांच्याकडे दिली आहे. पूर्वांचलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसी मतदारसंघ आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ नेतृत्व करत असलेला गोरखपूर मतदारसंघ आहे.