‘प्लाझ्मा दान केल्यास मिळणार 5000 रुपये’, ‘या’ सरकारचा मोठा निर्णय !

पटणा : वृत्तसंस्था –   कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या उपचारासाठी प्लाझ्मा उपयुक्त ठरत असल्याचं सिद्ध होत आहे. एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे तशी प्लाझ्माचीही मागणी वाढत आहे. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

आजच्या 74 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पटण्यातील गांधी मैदानावर ध्वजारोहण केलं. यावेळी नितीश कुमार यांनी कोरोनामुक्त झालेल्या लोकांना प्लाझ्मा दान करण्याचं आवाहन केलं. इतकंच नाही तर या बदल्यात त्यांनी बक्षीस देण्याचाही निर्णय घेतला आहे. जे कोरोनामुक्त लोक प्लाझ्मा दान करतील त्यांना 5,000 रुपयांचं बक्षीस देण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं.

नितीश कुमार यांनी यावेळी बोलताना सरकारच्या कामगिरीचं कौतुकही केलं. ते म्हणाले, “आपण कितीही चांगली कामं केली तरी लोक उणीवा काढत असतात.” गुन्हेगारी, भ्रष्टाचार आणि जातीयवाद याबाबत तडजोड न करण्याचा संकल्प देखील त्यांनी पुन्हा एकदा केला आहे.

सध्या देशात कोरोनाचा कहर सुरूच आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं शनिवारी (दि 15 ऑगस्ट) दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 65,002 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 996 लोकांचा मृत्यू झाला आहे. यानंतर आता देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता 25,26,193 इतकी झाली असून कोरोनामुळं मृत्यू पावलेल्यांची संख्या 49,036 एवढी झाली आहे.

देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 6,68,220 रुग्णांवर सध्या उपचार सुरू असून 18,08,937 रुग्ण उपचारानंतर बरे होऊ आपल्या घरी गेले आहेत.