‘मुलगी होईल म्हणून नितीश कुमार यांनी दुसरे मूल जन्माला घातले नाही’ : तेजस्वी यादव

पाटणा : पोलीसनामा ऑनलाइन –  बिहार विधानसभा निवडणूक संपली तरी आरोप-प्रत्यारोप मात्र अजून सुरूच आहेत. महाआघाडीचा निसटता पराभव झाल्यापासून महाआघाडीचे नेते आणि सत्ताधारी जेडीयू तसेच भाजपच्या नेत्यांकडून एकमेकांविरोधात गरळ ओकली जात आहे. दरम्यान, वैयक्तिक पातळीवर पोहोचले आहेत. बिहार विधानसभेमध्ये राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा होत असताना, मुख्य विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप सुरू केले. मुलगी होईल म्हणून नितीश कुमार यांनी दुसरे मूल जन्माला घातले नाही, अशी मुक्ताफळे तेजस्वी यादव यांनी उधळली.

निवडणुकीच्या प्रचारावेळी नितीश कुमार यांनी लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबावर हल्लाबोल केला होता. लालूप्रसाद यादव यांनी मुलगा हवा या हव्यासापोटी त्यांनी नऊ मुलींना जन्म दिला, लालूंना मुलींवर विश्वास नव्हता, असा आरोप नितीश कुमार यांनी केला होता. त्यावेळी त्याला कोणीही उत्तर दिले नव्हते, त्यामुळे तेजस्वी यांचे आरोप हे त्याचेच उत्तर असल्याची चर्चा आहे.

विधानसभेत बोलताना तेजस्वी यादव म्हणाले की, मुलगी जन्माला येईल या भीतीने नितीश कुमार यांनी दुसरे मूल जन्माला घातले नाही. नितीश कुमार हे हत्येच्या प्रकरणातील आरोपी आहेत. तसेच त्यांनी कॉपिराइट उल्लंघनाच्या एका प्रकरणात २५ हजार रुपये दंड भरावा, असा आरोपही केला.

तेजस्वी यादव यांनी केलेले आरोप फेटाळले

संसदीय कार्यमंत्री विजयकुमार यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, हत्येच्या प्रकरणाचा खटला पाटणा हायकोर्टाने आधीच फेटाळून लावला आहे. तसेच कोर्टाने या आरोपांवर कठोर टिप्पणी केली आहे. त्यानंतर संसदीय कार्यमंत्र्यांनी सभागृहाच्या कामकाजामधून हे आरोप फेटाळून लावण्यात यावेत, असे निवेदन विधानसभा अध्यक्षांना दिले.

नितीश कुमार संतापले

तेजस्वी यांनी केलेल्या आरोपामुळे ते चांगलेच संतापले. ते म्हणाले, तेजस्वी यादव तुम्ही चार्जशिटेड आहात. माझ्या मित्राचे पुत्र आहात. त्यांना मी नेते बनवले होते. त्यानंतर ते मुख्यमंत्री झाले होते. तेजस्वी यादव यांची चौकशी करा. त्यांच्याविरोधात कारवाई होईल. हे खोटे बोलत आहेत. माझ्या भावासमान मित्राचा मुलगा आहे, म्हणून ऐकून घेतो असेही ते म्हणाले.

You might also like