भाजपनं ‘गेम’ केल्यानं नितीश नाराज, आज उत्तर देणार ?

पोलिसनामा ऑनलाईन – भारतीय जनता पक्षानं (BJP) अरुणाचल प्रदेशमध्ये संयुक्त जनता दलाला (जेडीयू) धक्का दिला. बिहारमध्ये संयुक्त जनता दलासोबत भारतीय जनता पक्ष सत्तेत आहे. दरम्यान, जेडीयूचे सातपैकी सहा आमदार भाजपनं फोडले. परिणामी, जेडीयूचे अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Chief Minister Nitish Kumar)
अतिशय नाराज असल्याचं समजतं. त्यामुळे आज जेडीयूची (JDU) महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. त्यामध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपला धक्का बसू शकतो. या पार्श्वभूमीवर, नितीश कुमार (Nitish Kumar) भाजपला टक्कर देण्यासाठी त्यांचा जुनाच डाव नव्याने टाकू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

दरम्यान, काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्तींच्या पीडीपीसोबत, बिहारमध्ये जेडीयूसोबत केलेल्या युतीवरूनही शिवसेनेनं भाजपला लक्ष्य केलं होतं. काश्मीर प्रश्न, गोमांस बंदीबद्दलची भाजपची भूमिका यासह अनेक विषयांवर शिवसेनेनं सामनामधून भाजपला लक्ष्य केलं होतं. याशिवाय भाजपसोबत असताना शिवसेनेनं अनेक निर्णयांवरून मोदी सरकारवर तोफ डागली होती. नोटबंदीला सत्तेत राहूनही विरोध केला. पहिला आवाज आम्ही उठवला, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी वारंवार म्हटलं आहे. आता तशीच रणनीती जेडीयूकडून वापरली जाऊ शकते.

आज जेडीयूच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक होत आहे. यामध्ये काही राष्ट्रीय मुद्द्यांवर भाजपपेक्षा वेगळी भूमिका घेतली जाऊ शकते. केंद्रात, राज्यात सोबत राहून भाजपवर वेळोवेळी शरसंधान साधण्याची भूमिका नितीश घेऊ शकतात. बिहारमध्ये एकत्र सत्तेत असताना अरुणाचल प्रदेशात भाजपनं जेडीयूला धक्का दिला. त्यामुळे आता जेडीयूकडूनही भाजपला त्यांच्याच पद्धतीनं प्रत्युत्तर दिलं जाऊ शकतं. भाजपप्रणित एनडीएमध्ये राहून भाजपला धक्के देण्याची जेडीयूची रणनीती असू शकते.

शिवसेनेनंदेखील अशाच प्रकारचं राजकारण केलं

एनडीएनं राष्ट्रपतीच्या निवडणुकीत पी. ए. संगमा यांना उमेदवारी दिली होती. मात्र जेडीयूनं त्यांच्या ऐवजी काँग्रेसच्या प्रणब मुखर्जींना पाठिंबा दिला आणि त्यांच्याच बाजूनं मतदान केलं. शिवसेनेनंदेखील अशाच प्रकारचं राजकारण केलं होतं. २०१२ मध्ये नितीश एनडीएमध्ये होते. त्यावेळी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत नितीश यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देत सगळ्यांनाच धक्का दिला.

नोटबंदी, जीएसटी, बेनामी संपत्ती, सर्जिकल स्ट्राईकचं कौतुक

नितीश कुमार हे राष्ट्रीय जनता दलापेक्षा जेडीयूचे कमी आमदार असूनही ते मुख्यमंत्री झाले. मात्र त्यांनी अनेकदा केंद्र सरकारच्या निर्णयांचं समर्थन केलं. २०१५ मध्ये नितीश कुमार यांनी राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेससोबत महागठबंधन करत विधानसभा निवडणूक जिंकली. नोटबंदी, जीएसटी, बेनामी संपत्ती, सर्जिकल स्ट्राईकचं नितीश यांनी कौतुक केलं होतं.