सरकार विरोधात आंदोलन कराल तर सरकारी नोकरीला मुकाल ! या राज्यातील मुख्यमंत्र्याचे अजब ‘फर्मान’

पोलीसनामा ऑनलाईन – बिहारमध्ये नितीशकुमार सरकारने मंगळवारी (दि. 2) एक अजब फर्मान जारी केले आहे. जर कुणी आपल्या मागण्यांसाठी सरकारविरोधात निदर्शने, आंदोलन, रास्तारोको केले तर पोलिसांकडून अशा व्यक्तीच्या चारित्र्य प्रमाणपत्रात नकारात्मक शेरा दिला जाणार आहे. त्यामुळे व्यक्तीच्या सरकारी नोकरीवर नामुष्की ओढावण्याची शक्यता आहे.

बिहार पोलिसांच्या नव्या आदेशानुसार राज्यातील कोणताही व्यक्ती निदर्शने, चक्काजाम, रास्तारोको आदी घटनांमध्ये सामील होऊन कोणत्याही गुन्ह्याला कारणीभूत ठरला असेल आणि त्याविरोधात पोलीस ठाण्यात आरोप पत्र दाखल केले असेल तर त्याचा उल्लेख संबंधित व्यक्तीच्या चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रात केला जाणार आहे. यामुळे संबंधित व्यक्तींना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागणार आहे. या आदेशामुळे सरकार विरोधी निदर्शनं करणाऱ्यांविरोधात जर गुन्हा दाखल झाला तर अशांना सरकारी नोकरी किंवा कोणतेही सरकारी काम मिळू शकणार नाही.

बिहारचे पोलीस महासंचालक एस. के. सिंघल यांच्यावतीने जारी केलेल्या आदेशात सरकारी कंत्राट, सरकारी नोकरी, हत्यार बाळगण्याचा परवाना आणि पासपोर्टसाठी नागरिकांना पोलिसांकडून सत्य पडताळणी प्रमाणपत्र मिळणे आवश्यक असल्याचे नमूद केेले आहे.

दरम्यान नितीश कुमार सरकारच्या या आदेशावर विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी जोरदार हल्ला केला आहे. मुसोलिनी आणि हिटलरला आव्हान देणाऱ्या नितीश कुमार यांनी राज्यात कुणीही लोकशाहीच्या अधिकाराखाली त्यांच्याविरोधात आंदोलन केले तर अशांना सरकारी नोकरी मिळणार नाही. म्हणजे हे लोक नोकरी पण देणार नाहीत आणि सरकारविरोधात निदर्शन देखील करू देत नाहीत. फक्त 40 जागा निवडणून आलेल्या पक्षाचे बिचारे मुख्यमंत्री खूप डरपोक आहेत, असे ट्विट यादव यांनी केले आहे.