…म्हणून लोकसभा निवडणूक फक्त २ ते ३ टप्यातच घ्यावी : नितीशकुमार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आज मतदान केले. यावेळी त्यांनी खूप काळ चाललेल्या निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले कि एवढ्या तापमानात निवडणूक प्रक्रिया खूप काळ चालू असणे योग्य नाही. या निवडणूक प्रक्रियेला दोन किंवा तीन टप्यात विभागून फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात लोकसभा निवडणूक घेतली पाहिजे. यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावून चर्चा झाली पाहिजे.

दरम्यान, नितीशकुमार यांनी भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञा यांच्या नथुराम गोडसे विषयी केलेल्या वादग्रस्त विधानाचा निषेध केला. प्रज्ञा यांच्यावर काय कारवाई केली पाहिजे हा भाजपचा पक्षांतर्गत प्रश्न आहे. यांसारख्या विधानाला आम्ही पाठींबा देत नाही, असेही नितीशकुमार म्हणाले.

नितीशकुमार म्हणाले कि, एप्रिल-मे महिन्यातील अधिक तापमानामुळे नागरिकांचा मतदानातील सहभाग कमी होतो. एकाच टप्यातील निवडणूक चांगली झाली असती, पण देश मोठा असल्यामुळे दोन किंवा तीन टप्यात निवडणूक घेता येऊ शकते.

बिहारमध्ये सात टप्यात मतदान

बिहारमध्ये सात टप्यात मतदान होत आहे. सातव्या टप्यात आज आठ लोकसभा मतदारसंघासाठी मतदान चालू आहे. या टप्यात बिहारमध्ये नालंदा, पटनासाहिब, पाटलीपुत्र, आरा, बक्सर, सासाराम, काराकाट, जहानाबाद या मतदारसंघात मतदान होत आहे. या ठिकाणी शत्रुघ्न सिन्हा, रविशंकर प्रसाद, अश्विनी कुमार चौबे, मीरा कुमार, रामकृपाल यादव, आरके सिंह, उपेंद्र कुशवाहा आणि मीसा भारती सोबत अनेक दिग्गज लोकांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.