‘शत्रू कोण अन् मित्र कोण कळलेच नाही ? मुख्यमंत्री नितीशकुमारांचा भाजपवर ‘हल्ला’

पाटणा : वृत्तसंस्था – नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या वेळी आपला मित्र कोण होता आणि शत्रू कोण हे कळले नाही?, असे मोठे विधान बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केले आहे. नितीशकुमार यांनी आपल्या वक्तव्यातून मित्रपक्ष असलेल्या भाजपवर निशाणा साधल्याचे बोलले जात आहे. कारण निवडणुकीत आपला पराभव हा लोक जनशक्ती पार्टीमुळे नाही तर भाजपमुळे झाल्याचा दावा यावेळी उपस्थित पराभूत झालेले जेडीयू आमदारांनी केला आहे.

जनता दल युनायटेडच्या (जेडीयू) च्या राज्य कार्यकारिणीच्या दोन दिवस चालणा-या बैठकीत संबोधित करताना शनिवारी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी हे विधान केले आहे. यावेळी चंद्रिका राय, बोगो सिंह, जय कुमार सिंह, ललन पासवान, अरुण मांझी आणि असम परवीन या जेडीयूच्या नेत्यांनी निवडणुकीतील पराभवात भाजपच्या भूमिकेवर बैठकीत प्रश्न उपस्थित केला. निवडणुकीत आपला झालेला पराभव लोक जनशक्ती पक्षामुळे नाही तर भाजपमुळे झाल्याचे असे या नेत्यांनी म्हटल्याचे सांगितले जात आहे.

निवडणुकीच्या काळात एक घोषणा दिली जात होती. एलजेपी-भाजप भाई-भाई. यामुळे त्याचा फटका हा जेडीयू बसल्याची दाट शक्यता आहे. जे सत्य आहे, ते मांडणे गरजेचे आहे, असे मटिहाणी मतदारसंघातून पराभूत झालेले जेडीयू नेते बोगो सिंह म्हणाले. यावेळी बैठकीला उपस्थित संयुक्त जनता दलाचे सवर्च नेते भाजपविरोधात बोलत होते. त्यावेळी नितीशकुमार आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष हे आरसीपी सिंह हे शांतपणे ऐकत होते.

बिहार निवडणुकीत 5 महिन्यांपूर्वीच एनडीएमधील सर्व मुद्द्यांवर चर्चा करायला हवी होती. पण तसे झाले नाही, असे नितीशकुमार यावेळी म्हणाले. संयुक्त जनता दलाचे बिहारमध्ये 45 लाख सदस्य आहेत. तरीही निवडणुकीत प्रत्यक्षात पक्षाचे मुद्दे पोहोचले नाहीत आणि निवडणुकीत पक्षाची कामगिरी चांगली राहिली नाही. गेल्या काही वर्षांमध्ये बिहारसाठी आपण जी काही कामे केली. ती जनतेपर्यंत पोहोचवता आली, असे मुख्यमंत्री नितीशकुमार म्हणाले.