Bihar Assembly Election 2020 : भाजपाला मिळणार सर्वाधिक जागा, तरी देखील नितीश कुमार बनणार मुख्यमंत्री, गृहमंत्री अमित शहांनी सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   बिहार विधानसभा निवडणुकी (Bihar Assembly Elections) मध्ये भाजपा आणि जेडीयू (JDU) यांच्यात मतभेद झाल्याच्या वृत्तांना गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit shah) यांनी पूर्णविराम दिला आहे. बिहार निवडणुकीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना अमित शाह शनिवारी म्हणाले की, ‘जे कुणी गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न करीत आहे. मला आज यावर एक मोठा पूर्णविराम द्यायचा आहे. नितीशकुमार हेच बिहारचे पुढचे मुख्यमंत्री असतील.’ शाह म्हणाले की, देशासोबतच बिहारमध्येही मोदी लाट आहे आणि यामुळे युतीतील भागीदारांनाही तितकीच मदत होईल. शाह म्हणाले, नितीश हे आमचे जुने साथीदार आहेत, युती तोडण्याचे कोणतेही कारण नाही.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अमित शाह म्हणाले की, ‘बिहार विधानसभा निवडणुकीत जरी भाजपाला जास्त जागा मिळाल्या तरीही नितीशकुमार हेच मुख्यमंत्री बनतील.’ शाह यांनी सांगितले की त्यांनी विविध पक्ष अधिकाऱ्यांचा अभिप्राय घेतला, जे अलीकडेच बिहारमध्ये गेले होते आणि त्यांना असे आढळले आहे की कोविड-19 च्या कालावधीत पंतप्रधानांच्या योजनेतून अन्नधान्य व पैशांचे हस्तांतरण झाल्यामुळे बिहारमधील जनतेला बरीच मदत झाली आहे, त्यामुळे त्यांच्या मनात एक नवीन प्रतिमा तयार झाली आहे.

ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांकडून घेतला अभिप्राय

शाह म्हणाले, मी अशा लोकांचा अभिप्राय घेतला आहे जे राज्यातील ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागात राहिलेले आहेत. मार्चपासून छठ उत्सवापर्यंत वितरित केलेल्या अन्नधान्याचे कोणाकडूनही पैसे घेण्यात आलेले नाहीत. बिहारचे लोक हे कधीच विसरणार नाहीत की नितीशकुमार यांनी कशा प्रकारे त्यांच्या प्रवासाची व्यवस्था केली, त्यांच्या यात्रेसाठी आर्थिक मदत केली, प्रवासी कामगारांना प्रत्येकी 1,000 रुपयांची आर्थिक मदत दिली.

एनडीएपासून विभक्त झाली एलजेपी

शाह यांचे हे वक्तव्य अशा वेळी समोर आले आहे जेव्हा केंद्रातील एनडीएचा साथीदार पक्ष लोक जनशक्ति पक्षाने (LJP) बिहारमध्ये स्वतःला विभक्त करून घेतले आहे. एलजेपीने जेडीयूच्या विरोधात आपले उमेदवार उभे करण्याची घोषणा देखील केली आहे.

अमित शाह आपल्या शब्दावर कायम आहेत

अमित शाह यांनी नितीशकुमार यांच्या समर्थनार्थ विधान करणे हे पहिलेच प्रकरण नाही. याआधी देखील अमित शाह यांनी बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगितले होते की, एनडीएकडून नितीशकुमार हेच मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील.