‘कुबड्या’ न घेता २ लाख ७८ हजार मते : नितेश राणे

कणकवली : वृत्तसंस्था – आम्ही कुणाच्या ‘कुबड्या’ न घेता २ लाख ७८ हजार मते मिळवली आहेत. लोकसभा निवडणुकीतील पराभवाने खचून जाणार नाही असे स्पष्ट करताना विविध मतदारसंघातील मताधिक्य पाहता येत्या विधानसभा निवडणुकीत स्वाभिमान पक्षाचे आमदार निश्चित निवडून येतील असा ठाम विश्वास आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे.

कणकवलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत आमदार राणे म्हणाले कि ,रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्ह्यात फक्त स्वाभिमान पक्षाला २ लाख ७८ हजार मते मिळाली आहेत. ही मते म्हणजे आमच्यावरील विश्वासाची पोचपावती आहे. आम्ही कुणाशी युती केली नव्हती कि कुबड्या घेतल्या नव्हत्या . निव्वळ आमच्या पक्षाची ही मते आहेत. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत आमची ताकद पुन्हा दिसेल असेही ते म्हणाले. ज्या वातावरणात आम्ही निवडणूक लढवली, त्याचा विचार केला असता हा निकाल धक्कादायक आहे असे सामान्य मतदारही सांगेल असा दावाही आमदार राणे यांनी केला. कणकवलीत आम्हाला १० हजार ७३१ चे मताधिक्य मिळाले आहे. कुडाळमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराला फारच कमी मताधिक्य आहे. तशीच परिस्थिती रत्नागिरीतील काही मतदारसंघात आहे.त्यामुळे विधानसभेत महाराष्ट्र स्वाभिमानचे काही आमदार निश्‍चितपणे निवडून येतील.