विधानसभा निवडणुकीत ‘वंचित’ देणार काँग्रेसला धक्का !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभेत वंचितच्या उमेदवारांमुळे काँग्रेसच्या उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत वंचितला सोबत घेऊन निवडणुका लढवण्याचा मनसुबा काँग्रेसचा आहे. काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकरांची बोलणी निष्फळ झाल्याने येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला धक्का बसणार आहे. वंचित आघाडी काँग्रेससोबत येण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरत असल्याची कबूली विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. दिल्लीमध्ये आज झालेल्या छाननी समितीच्या बैठकीनंतर वडेट्टीवार प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

काँग्रेसच्या छाननी समितीत विजय वडेट्टीवार यांचा समावेश करण्यात आला नव्हता. मात्र, त्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर दिल्लीतून सुत्र हालली. यानंतर वडेट्टीवार यांचा समावेश छाननी समितीमध्ये करण्यात आला. या समितीचे अध्यक्ष ज्योतिरादित्य शिंदे हे असून आज काँग्रेस मुख्यालयातील वॉर रुमध्ये झालेल्या बैठकीमध्ये राज्यातील 288 मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. यापुढील दुसरी बैठक 5 सप्टेंबर रोजी होणार आहे.

या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, काँग्रेसला वंचितशी आघाडी करायची आहे. मात्र, त्यांनी अटी अशा घातल्या आहेत की आघाडी करणं अशक्यच आहे. त्यांना काँग्रेससोबत आघाडी करण्याची इच्छा नाही अशी टीका त्यांनी प्रकाश आंबडेकर यांच्यावर केली. कडूलिंबामध्ये कितीही साखर टाकली तर गोड होत नाही तसा प्रकार वंचित बहुजन आघाडीचा आहे. प्रकाश आंबेडकर यांच्याकडे आम्ही वारंवार गेलो पण ते बोलायला तयार नाहीत. कधी म्हणतात आरएसएस संदर्भात भूमिका जाहीर करा, कधी म्हणतात चाळीस जागा द्या, तर कधी म्हणतात राष्ट्रवादी सोबत आघाडी तोडा हे कसं चालणार? त्यांच्या अशा वागण्यामुळे आम्ही कितीही प्रयत्न केले तरी ते यशस्वी होणार नाहीत असे आपल्या वाटते असे ही त्यांनी म्हटले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –