रेल्वे स्थानकावर तरूणीचं ‘चुंबन’ घेणार्‍याला नितीन नांदगावकरांनी दिला ‘चोप’ (VIDEO)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काही दिवसांपूर्वी मुंबईच्या माटुंगा रेल्वे स्थानकावर एका तरुणीचा विनयभंग करून तिच्या गालावर चुंबन घेणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र, त्याच्या विरोधात कोणीही तक्रार दिली नसल्याने पोलिसांनी त्याला सोडून दिले. आरोपीने पादचारी पुलाच्या पायऱ्या चढून जात असताना पाठिमागून येऊन तिचे बळजबरीने चुंबन घेऊन पळून गेला होता. हा सर्व प्रकार रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्हमध्ये कैद झाला होता.

https://www.facebook.com/nitinnandgoankar/videos/125125408891056/

पोलिसांनी आरोपीला सोडून दिल्यानंतर शिवसेनेचे नेते नितीन नांदगावकर यांनी या आरोपीचा शोध घेऊन त्याला चांगलीच समज दिली. आरोपी तरुणाला समज देतानाचा व्हिडिओ त्यांनी आपल्या फेसबुकवर शेअर केला आहे. त्यांनी आरोपी तरुणाला मारहाण करत यापुढे कधीच कोणत्याही महिलेची छेडछाड करणार नसल्याचे त्याच्या तोंडून वदवून घेतले. माटुंगा स्टेशनवर तरुणीसोबत छेडछाड करीत तिच्या अंगाला स्पर्श करणारा आणि काही कळायच्या आत तेथून धूम ठोकणाऱ्या विकृताला नितीन नांदगावकर यांनी कायदा हातात घेवून मारहाण केली आहे. तसेच पोलीस माझ्यावर कारवाई करु शकतात असेही त्यांनी म्हटले आहे.

चुकीला माफी नाही असे कॅप्शन त्यांनी फेसबुकवर शेअर केलेल्या व्हिडीओला दिले आहे. तब्बल 6.15 मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये त्यांनी आरोपीला मारहाण केली. व्हिडीओमध्ये त्यांच्या मागे बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे. आरोपीने ज्या हाताने मुलीला स्पर्श केला होता. त्याच हातावर नितीन यांनी पाय ठेऊन त्याला मारहाण केल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. शिवसैनिक म्हणून महिलांची सुरक्षा करणं ही आमची जबाबदारी आहे आणि यापुढे मुंबईतील महिलांना अशा प्रकारे हात लावणाऱ्यांचे हात छाटले जातील, असे नितीन नांदगावकर यांनी म्हटले आहे.