‘कोरोना’ची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना बेड न देण्याचा निर्णय ?

पोलिसनामा ऑनलाईन – राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या 20 ते 24 हजाराने वाढत आहे. त्यामुळे गंभीर रुग्णांना कोरोना रुग्णालयात उपचारासाठी बेड मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना यापुढे उपचारासाठी ‘कोरोना केअर सेंटरमध्ये किंवा घरीच उपचाराखाली ठेवण्याचा निर्णय आरोग्य विभागाने जारी केला आहे. सौम्य करोना रुग्णांना यापुढे बेड न देण्याची निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यात आतापर्यंत कोरोनाचे 11 लाख 67 हजार रुग्णसंख्या असून गेले चार दिवस रोज 400 हून अधिक रुग्ण दगावत आहेत. कोरोना रुग्ण आणि रुग्णालयातील बेड यांचे प्रमाण व्यस्त झाले आहे. कोरोना रुग्णांसाठी शासकीय व आरोग्य विभागाच्या रुग्णालयातही बेड मिळणे कठीण झाले आहे. कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, नाशिकसह राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात करोना रुग्णांना ऑक्सिजन बेड वा अतिदक्षता विभागात बेड मिळणे कठीण झाले आहे. बहुतेक खासगी रुग्णालयात तसेच शासकीय व्यवस्थेतही सौम्य लक्षणे असलेले करोना रुग्ण घाबरुन दाखल होत आहे. त्यामुळे गंभीर रुग्णांना आज अतिदक्षता विभागात तसेच ऑक्सिजन असलेले बेड मिळवताना अनेक कसरती कराव्या लागत आहेत. त्यापार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने बैठक घेऊन सौम्य लक्षणे असलेले कोरोना रुग्ण पन्नाशीच्या आतील असतील तसेच कोमॉर्बीड म्हणजे मधुमेह, उच्च रक्तदाब आदी आजार नसतील तर त्यांना घरीच क्वारंटाइन करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे आदेश आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी आदेश जारी केला आहे.