भाजपचे कोणतेही आमदार शरद पवारांच्या संपर्कात नाहीत : चंद्रकांत पाटील

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मागील काही दिवसांपासून भाजपचे आमदार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संपर्कात असल्याची चर्चा होती. यावर बोलताना भाजप प्रदेशाध्य चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, भाजपचे कोणतेही आमदार शरद पवारांच्या संपर्कात नाहीत. तसेच या सरकारमध्ये एवढी खुन्नस काढली जात आहे की, मतदारसंघातील साधी कामही होत नाहीत, अशा शब्दात त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.

पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांच्यासोबत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली. त्यानंतर भाजपचे काही आमदार शरद पवार यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चावरून विचारले असता त्यांनी त्यांची भूमिका मांडली. ते म्हणाले, राजकारणात अनेकांचे जुने संबंध असतात. काही आमदार कामानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांना भेटत असतील यावरून भाजपाचे आमदार राष्ट्रवादीत जाणार असे बोलले जात असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

पवार व महाविकास आघाडी त्यांच्या आमदरांना विश्वास देण्याचा प्रयत्न करत आहे की, आपले आमदार जात नाहीत आम्हीच त्यांचे आणतो आहोत, असं देखील यावेळी आमदार चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी भाजपमध्ये गेलेले काही आमदार आमच्या संपर्कात असून त्यांना पक्षात घेण्यावर लवकरच निर्णय घेतला जाईल असे सांगितले आहे.