युतीसमोर कोणताच कॅप्टन उभा राहायला तयार नाही’ : मुख्यमंत्र्यांचा पवारांना टोला

अमरावती : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेना-भाजप युती अभेद्य आहे असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. काहीजण शिवसेना-भाजप भांडावेत म्हणून देव पाण्यात घालून बसले होते परंतु ही युती निवडणुकीपुरती नाही असे त्यांनी स्पष्ट केले. ही युती सत्तेसाठी नाही तर ही विचारांची युती आहे म्हणूनच ती टिकली आहे आणि भविष्यात टिकणार आहे असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
काही दिवसांपूर्वीच शिवसेना-भाजप युती जाहीर झाली. यानंतर पहिल्यांदाच अमरावती येथे शिवसेना-भाजपा कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
‘युतीसमोर आता कोणताच कॅप्टन उभा राहायला तयार नाही’
दरम्यान या सभेत युतीवर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी आघाडीवर टीका केली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, “शिवसेना-भाजपा युतीसमोर आता कोणताच कॅप्टन उभा राहायला तयार नाही. एक माघार घेतो, दुसरा म्हणतो मी उभा राहणार नाही, पत्नी निवडणूक लढवणार” असा टोला फडणवीस यांनी शरद पवार यांना नाव न घेता लगावला.
‘पूर्ण ताकदीने महाराष्ट्राला भगवे केल्याशिवाय राहणार नाही’
पुढे बोलताना ते म्हणाले की, “सत्ता येईल, जाईल पण देश महत्वाचा आहे. गेल्यावेळी ४२ जागा जिंकल्या. तो आपला रेकॉर्ड नव्हता. खरा रेकॉर्ड तर २०१९ मध्ये करायचा आहे. पूर्ण ताकदीने महाराष्ट्राला भगवे केल्याशिवाय राहणार नाही” असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. इतकेच नाही तर, ‘ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार आहेत तिथे भाजपचे कार्यकर्ते जिवाचं रान करतील तर जिथे भाजपचे उमेदवार आहेत त्याठिकाणी शिवसैनिकांचे बळ उमेदवारांच्या पाठिशी उभं राहिल. त्यामुळे तुम्ही चिंता करु नका, एकजूटीने काम करा’ असं आवाहन कार्यकर्त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं.
‘निवडणुकीतील विजयापेक्षा लोकांच्या चेहऱ्यावरील समाधान अधिक आनंद देतो’
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “गेल्या 5 वर्षात केंद्रात आणि राज्यात युतीच्या सरकारने केलेलं काम अभूतपूर्व आहे. सामान्य गरिबांसाठी केंद्र सरकारने अनेक योजना आणल्या. प्रधानमंत्री आवास योजना, उज्वला, उजाला, प्रधानमंत्री जनारोग्य, शेतकरी सम्मान निधी, गरिबांसाठी अनेक योजना अशा अनेक योजनांच्या माध्यमातून कल्याणकारी उपक्रम राबविले जात आहेत. निवडणुकीतील विजयापेक्षा लोकांच्या चेहऱ्यावरील समाधान अधिक आनंद देतो.” असेही फडणवीस म्हणाले.
‘कल तक जो नामुमकिन था अब वो मुमकिन है’
इतकेच नाही तर, यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी रोजागरावरही भाष्य केलं. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “देशातील सर्वाधिक रोजगार एकट्या महाराष्ट्रात निर्माण झाले आहेत. केवळ ११ महिन्यात २७ टक्के रोजगार निर्मिती झाली आहे.  कल तक जो नामुमकिन था अब वो मुमकिन है हा विश्वास आता लोकांमध्ये निर्माण झाला आहे” असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us