चिनी बनावटीच्या वस्तूंवर बहिष्कार : अमृत पठारे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आम्ही भारतीय अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी आजपासून भारतीय बनावटीच्या वस्तू वापरणार आहे. चीनच्या वस्तूंवर बहिष्कार टाकला आहे. लडाखमध्ये जे झालं त्याविरोधात आम्ही निषेध करीत चीनचा ध्वज जाळला. नागरिकांनी चिनी बनावटीची कोणतीही वस्तू वापरू नये, असे आवाहन अ‍ॅन्टी टास्क फोर्सच्या पुणे शहर-जिल्हा प्रसिद्धीप्रमुख अमृत पठारे यांनी केले.

महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अ‍ॅन्टी टास्क फोर्सच्या अध्यक्षा भारती चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पठारे यांनी वडगावशेरी (चंदननगर-खराडी) येथे चीनने केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ चिनच्या ध्वजाची होळी केली. तसेच यावेळी चिनी बनावटीची कोणतीही वस्तू वापरणार नाही, अशी शपथ घेण्यात आली.

याप्रसंगी अमृत बहुद्देशीय संस्थेच्या सचिव पूजा धुमाळ, सुजाता देशमुख, मनीषा थोरात, जोती बेल्हेकर, सुधाकर काटे, अ‍ॅन्टी टास्क फोर्सचे इसाक शेख, मनोहर मीसाळ ,पूर्वा साबळे, आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी चिनच्या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या भारतीय सैनिकांना अभिवादन करण्यात आले.