धनंजय मुंडे यांच्याबाबत रेणू शर्मा यांचे निवेदन; ’त्या’ Video संदर्भातही दिले स्पष्टीकरण

पोलिसनामा ऑनलाईन, मुंबई, : रेणू शर्मा या महिलेने बलात्काराचा आरोप केल्याने महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (dhananjay munde) अडचणीत आले होते. मुंडे यांच्यावर यावरून भाजप नेत्यांकडून सतत निशाणा साधण्यात येत होता. या सगळ्या गदारोळानंतर आज अचानक रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडे (dhananjay munde) यांच्याविरुद्धची तक्रार मागे घेतली आहे. त्यामुळे या विषयातील हवाच निघून गेलीय.

रेणू शर्मा यांनी मुंडे यांच्याविरुद्धची तक्रार मागे घेतल्यानंतर ट्वीटरच्या माध्यमातून एक निवेदन जारी केलंय. या निवेदनाने मुंडे यांच्यावरील राजकीय मळभ पूर्णत: दूर झाला असल्याचे दिसत आहे.

मंत्री धनंजय मुंडे यांनी आपलं लैंगिक शोषण केलं आणि लग्नाचं आमिष दाखवून आपली फसवणूक केलीय, असा आरोप करून रेणू शर्मा यांनी खळबळ उडवून दिली होती.

दरम्यान, रेणू शर्मा आपल्याला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतेय, असे स्पष्ट करत धनंजय मुंडे यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळलेत. त्याचवेळी रेणू शर्मा यांची मोठी बहिण करुणा यांच्याशी आपले संबध होते आणि त्यांच्यापासून आपल्याला दोन मुले आहेत. त्यांना आपण आपले नावही दिलंय, असे मुंडे यांनी स्पष्ट केलं होतं.

धनंजय मुंडे यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव वाढत असताना रेणू शर्मा यांच्यावर भाजपचे माजी आमदार कृष्णा हेगडे आणि मनसे नेते मनीष धुरी यांनी आरोप केलाय. आम्हालाही या महिलेने ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला होता, असा दावा या दोघांनी केल्याने या संपूर्ण प्रकरणाला कलाटणी मिळालीय. त्यातून रेणू शर्मा या संशयाच्या भोवर्‍यात अडकल्या. याप्रकरणी दोन्ही बाजूने चौकशी सुरू झालीय.

यादरम्यान, प्रकरणाचा गुंता वाढत असताना आज रेणू शर्मा यांनी आपली तक्रार मागे घेत या प्रकरणावर पडदा टाकलाय. रेणू यांनी ट्वीटरच्या माध्यमातून एक लेखी निवेदनही जारी केलंय. त्यांनी हिंदीतून आपली भूमिका मांडलीय.

असं आहे रेणू शर्मा यांचे निवेदन…
मी धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध लग्नाचं वचन देऊन ते न पाळल्याचा आणि बलात्काराचा जो आरोप केला होता. त्याबाबत माझं निवेदन खालील प्रमाणे आहे…

मी स्पष्ट करू इच्छित आहे की, माझी बहिण व धनंजय मुंडे यांच्यात काही काळापासून मतभेद निर्माण झालेेत आणि त्याबाबत कोर्टात केस सुरूय. यामुळे मी मानसिक तणाव आणि दबावाखाली होते. मात्र, विरोधी पक्ष ज्या पद्धतीने त्यांच्याविरुद्ध सक्रिय झालाय, ते पाहता मी कोणत्या तरी राजकीय षडयंत्राची बळी होतेय. काही लोक माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या चालवत आहेत, असे मला दिसतंय.

हे सर्वच चुकीचं असून मला माझ्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचं नाव खराब करायचे नाही. शेवटी मी इतकंच सांगेन की, धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध दाखल तक्रार मी पूर्णपणे मागे घेतेय. त्यांच्याविरुद्धच्या कोणत्याही तक्रारीचा मी आता पाठपुरावा करणार नाही. मला लग्नाचं वचन देऊन ते न पाळल्याची व बलात्काराची माझी आता कोणतीही तक्रार नाही, हे मी रेकॉर्डवर सांगत आहे. त्यांच्यासोबत माझा कोणताही आक्षेपार्ह फोटो किंवा व्हिडिओ नाही, हेसुद्धा मी नमूद करतेय. हे स्टेटमेंट मी अत्यंत जबाबदारीने व सजगपणाने देत आहे.