पुण्यामध्ये जमावबंदी नाही : महापौर मुरलीधर मोहोळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातच नव्हे तर संपुर्ण राज्यात लॉकडाउननंतर मिशन बिगेन अंतर्गत सर्व व्यवहार टप्प्याटप्प्याने सुरळीत होत आहेत. मागील सहा महिन्यांच्या कालावधीत कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला चांगले सहकार्य केले आहे. त्यामुळे शहरात  कुठलिही जमावबंदी लागू करण्याचा विचार नाही. मात्र, आर्थिक गाडे रुळावर आणतानाच नागरिकांसोबतच सर्वच घटकांनी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी अधिक दक्ष राहावे, असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे.

पुणे शहरातील कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना संसर्ग रोखण्यासाठी मुंबईच्या धर्तीवर पुण्यातही जमावबंदी करावी ? याबाबत प्रशासकीय पातळीवर चर्चा होत आहे. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज विधानभवन येथे आढावा बैठक झाली. या बैठकीमध्ये जमावबंदीचा मुद्दाही चर्चेत आला. अजित पवार यांनी देखिल स्थानीक पातळीवरील निर्णय, महापौर, महापालिका आयुक्त व लोकप्रतिनिधींनी एकत्रित बसून जमावबंदी बाबत काही ठरवावे, असे निर्देश दिले. या पार्श्‍वभूमीवर महापौर मुरलीधर मोहोळ आणि पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांची आज संध्याकाळी बैठक झाली.

या बैठकीमध्ये महापौर मुरलीधर मोहोळ यांनी जमावबंदी लागू करू नये, अशी भुमिका मांडली. मुंबईतही काहीवेळातच हे आदेश मागे घेण्यात आले आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या लॉकडाउनमध्ये नागरिकांनी चांगले सहकार्य केले आहे. लोकसंख्येच्या तुलनेते कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असली तरी प्रमाण आटोक्यात ठेवण्यात यश आले आहे. लॉकडाउन नंतर मिशन बिगेन अंतर्गत अर्थचक्र सुरळीत होत आहे. पीएमपीएमएलची सेवाही सुरू करण्यात आली आहे. एकीकडे हे प्रयत्न सुरू असताना पुन्हा जमावबंदी सारख्या उपाययोजना करणे नागरिकांच्या दृष्टीने हितावह नाही, अशी ठाम भुमिका घेतली आहे.

मात्र, ही भुमिका घेताना कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाचा संसर्ग होउ नये, यासाठी सार्वजनिक ठिकाणी काळजी घेतली पाहीजे. मास्कचा वापर असो अथवा सॅनिटायजेशन कटाक्षाने करायला हवे. अभूतपुर्व संकटामध्ये प्रशासन अहोरात्र काम करत असताना नागरिकांचे सहकार्य मिळाल्यास कोरोनाचा संसर्ग लवकर आटोक्यात येईल. यासाठी नागरिकांनी दैनंदीन व्यवहारात आपल्याला कोरोनाचा संसर्ग होणार नाही व आपण संसर्ग वाढविण्यात हातभार लावणार नाही, याची जबाबदारी घ्यावी असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे.