राष्ट्रवादी तुम्हाला काय देणार ? एकनाथ खडसेंनी दिलं ‘हे’ उत्तर

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन –   भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (eknath khadse) यांनी अखेर पक्षाचा राजीनामा दिला आहे. खडसे हे येत्या 23 ऑक्टोबरला राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश करणार आहेत. माझी पक्षावर, पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वावर कोणतीही नाराजी नाही. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांच्यामुळे मला प्रचंड त्रास झाला. त्यांच्यामुळे माझी बदनामी झाली. मला आणि माझ्या कुटुंबाला मनस्ताप झाला, अशा शब्दात एकनाथ खडसे यांनी फडणवीस यांच्यावर तोफ डागली आहे. ते मुक्ताईनगरमध्य झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

भाजप-शिवसेनेच्या (BJP-Shivsena) सरकारमध्ये खडसेंकडे महसूल मंत्रीपद होतं. त्यामुळे खडसेंना महाविकास आघाडी सरकारमध्ये स्थान मिळण्याची जोरदार चर्चा आहे. याबद्दल खडसेंना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अद्याप काहीही ठरलेलं नाही. पक्षात जी जबाबदारी मिळेल, ती समर्थपणे पार पाडेन. आतापर्यंत मी जे काही मिळवलं, ते माझ्या मेहनतीनं मिळवलं. यापुढेही कष्टानंच मिळवू, असं खडसे म्हणाले.

भाजप सोडताना खंत आहे. मला पक्षातून ढकलून लावलं. महिलेला माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करायला सांगितला, फडणवीसांनी मनस्ताप दिला. बहुजन समाजाचा मुख्यमंत्री असला पाहिजे, या माझ्या वक्तव्यानंतर जे घडलं ते महाराष्ट्राला माहिती आहे. एसीबी (ACB) चौकशी, भूखंड प्रकरण, दमानिया यांनी विनयभंगाचा खोटा खटलाही दाखल केला. पोलिसांच्या नकारानंतरही देवेंद्रजींनी सांगितल्याने खटला नोंदवला गेला, अशी टीका खडसे यांनी फडणवीस यांच्यावर केली.

मला राष्ट्रवादीने कोणतंही आश्वासन दिलं नाही मंत्रिपदाबाबत राष्ट्रवादीच सांगू शकेल. मला पदाची अपेक्षा नाही. माझ्या ताकदीने मी पदं मिळवली आहेत. सहकारातून मिळवलं आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होईपर्यंत माझ्यावर झालेला एक आरोप सांगा, नाईलाजाने मला भाजपाचा त्याग करावा लागत असल्याचे खडसे यांनी म्हटले आहे.