पंकजा मुंडे यांच्यासोबत कुठलाही वाद नाही, डॉ. भागवत कराड बुधवारी घेणार राज्यसभेची शपथ

नवी दिल्ली : माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्यासोबत कुठलाही वाद नाही, असा खुलासा राज्यसभेची शपथ घेण्यापूर्वी भाजपचे खासदार डॉ. भागवत कराड यांनी केला आहे. त्यामुळे आता अनेक वादावर पडदा पडल्याचे मानले जात आहे.

भारतीय जनता पक्ष अर्थात भाजपचे राज्यसभेचे नवनियुक्त खासदार डॉ. भागवत कराड हे बुधवारी राज्यसभेची शपथ घेणार आहे. त्यासाठी ते आज दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यांची मार्च महिन्यात राज्यसभेवर नियुक्ती केली होती. डॉ. भागवत कराड हे गोपीनाथ मुंडे गटाचे नेते समजले जातात.

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि बांधकाम व्यावसायिक असलेले संजय काकडे यांना डावलून भाजपने डॉ. भागवत कराड यांना राज्यसभेची जागा दिली होती. कराड यांची नियुक्ती करताना पंकजा मुंडे यांना विश्वासात घेतले नाही, अशी राजकीय चर्चा सुरु झाली होती. त्यावर कराड यांनी खुलासा करत असा वाद नसल्याचे स्पष्ट केले आहे.

याबाबत खासदार डॉ. भागवत कराड म्हणाले, पंकजा मुंडे आणि माझ्यात कुठलाही वाद नाही. मला राज्यसभेची उमेदवारी मिळाल्यावर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा फोन आला. त्यानंतर पंकजा मुंडे यांचाही फोन आला होता. त्यामुळे त्यांना माझ्या उमेदवारीची माहिती होती. दिल्ली येथे येण्याआधीही त्यांनी मला शुभेच्छा दिल्या आहेत.

माझा फॉर्म भरतानाही त्या उपस्थित होत्या त्यामुळे आमच्यात वाद असल्याच्या कुठल्याही गोष्टीत तथ्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. स्व. गोपीनाथ मुंडे यांचा मी एक सच्चा कार्यकर्ता आहे, असेही कराड म्हणाले.

भागवत कराड हे 1995 ते 2009 पर्यंत 3 वेळा औरंगाबादचे नगरसेवक होते. 1999 आणि 2006 असे दोन वेळा औरंगाबादचे महापौर होते. 2009 मध्ये भाजपातर्फे औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढवली पण, ते पराभूत झाले.भाजपमध्ये शहर सरचिटणीस, शहर जिल्हाध्यक्ष, मनपा गटनेता आणि भटक्या विमुक्त आघाडीचा अध्यक्ष अशा अनेक जबाबदार्‍या त्यांनी सांभाळल्या आहेत.

सध्या कराड पक्षात प्रदेश चिटणीस म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी आपल्यालाला राजकारणात आणले, अशी कृतज्ञताही कराड यांनी व्यक्त केली आहे.

…राजकीय चर्चेला मिळाला पूर्णविराम
भाजपकडून खासदारकीला एकनाथ खडसे आणि संजय काकडे यांना डावल्यानंतर कोणाला खासदारकी मिळणार? याची उत्सुकता अनेकांना लागली होती. तसेच एकनाथ खडसे आणि संजय काकडे यांना राज्यसभेची खासदारकी मिळेल, अशी दोघांनाही खात्री होती. त्याबाबतचे वातावरणही निर्माण झाले होते. त्यामुळे संजय काकडे यांनीही आपली खासदारकी फिक्स असल्याचे सांगत होते. मात्र, नंतर डॉ. भगवान कराड यांचे नाव समोर आल्याने राजकीय वर्तुळातील अनेकांना आश्चर्य वाटले होते. तर, गोपीनाथ मुंडे यांचा कार्यकर्ता असलेले डॉ. भगवान कराड यांना कशी उमेदवारी देण्यात आली. तेही मुंडे यांच्या कन्येला डावलून, अशीही चर्चा होत होती. मात्र, आता डॉ. भगवान कराड यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. त्यामुळे आता भाजपचे डॉ. भगवान कराड यांचा आता राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.