केंद्र सरकारने कॅगचा आरोप फेटाळला, ‘जीएसटी’ निधी इतरत्र वळविला नाही !

पोलिसनामा ऑनलाईन – महालेखापरीक्षकांनी (कॅग) वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) नुकसानभरपाई उपकरापोटी जमा केलेल्या रकमेपैकी 47,272 कोटींची रक्कम इतरत्र वळवल्याचा आरोप केला होता. याबाबत केंद्रीय अर्थ मंत्रालयाने आरोप फेटाळला आहे.केवळ तात्पुरत्या स्वरूपात हे पैसे ठेवून घेतले होते याचा अर्थ ते दुसर्‍या कारणासाठी वळते करून खर्च केले असा होत नाही, असे स्पष्टीकरण करण्यात आले आहे.

वस्तू आणि सेवा कराच्या भरपाईचे पैसे राज्यांना मिळत नसल्याची ओरड सुरू असतानाच कॅगच्या अहवालात ठपका ठेवण्यात आल्याने त्यावर वादंग झाले आहे. सरकारने राज्यांना द्यायच्या नुकसानभरपाईची रक्कम ठेवून घेतली व ती इतरत्र वापरली असा ठपका कॅगने ठेवला होता. नुकसानभरपाई कर हा केवळ राज्यांच्या महसुली नुकसानीची भरपाई करण्यासाठी होता, त्यावर मंत्रालयाने म्हटले आहे की, 2017-18 व 2018-19 मध्ये राज्यांना नुकसानभरपाईची रक्कम पूर्ण देण्यात आली आहे. नुकसानभरपाई रकमेच्या विनियोजनासाठी तात्पुरत्या काळासाठी निधी वळवणे म्हणजे निधीचा इतरत्र वापर असा होत नाही. राज्यांना महसुली नुकसानीच्या भरपाईचे पैसे पूर्णपणे देण्यात आल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. कॅगच्या अहवालानुसार जीएसटी उपकराची सगळी रक्कम जीएसटी भरपाई निधीत 2017-18 व 2018-19 मध्ये जमा करणे आवश्यक होते, पण केंद्राने ही रक्कम सीएफआयमध्ये जमा केली नाही व इतर कारणांसाठी वापरली. यासंदर्भात अर्थ मंत्रालयाने सांगितले की, ही रक्कम विनियोजनासाठी ठेवलेली होती. आगामी आर्थिक वर्षांचा विचार त्यात होता. ती रक्कम सीएफआयमध्ये होती. त्यामुळे ती रक्कम वळती केली असे म्हणणे चुकीचे असून, कॅगनेही अहवालात तसे म्हटलेले नाही.