आम्ही रात्री नाही, दिवसाढवळ्या कामे करतो, CM ठाकरेंचा फडणवीसांना टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शॉर्टकट मारले की रात्रीची कामे करावे लागतात. आमच्यावर मात्र तशी वेळ कधी आलेली नाही. आम्ही दिवसाढवळ्या कामे करतो. हो ना अजितदादा, असे विधान करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टोलेबाजी केली. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबोधित केले.
काम करताना इगो असता नये आणि शॉर्टकटही मारु नये. मग रात्रीची झाडे कापावे लागतात. आम्ही रात्री रात्रीची कामे दिवसा करायला लागलो, असा टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला. याचबरोबर प्रत्येक पाऊल शांततेने उचलावं लागणार आहे, ओरडून बोलल्याने कोरोना होतो, असा चिमटाही त्यांनी फडणवीसांना काढला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, मुंबईत जन्मलेली पहिली व्यक्ती महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून लाभली हे मी माझे भाग्य समजतो, जनसंपत्तीसह वनसंपत्तीही महत्त्वाची, जी कामे करायची ती आम्ही दिवसा ढवळ्या करतो, रात्रीच्या अंधारात नाही. मेट्रोसाठी जो खर्च झाला आहे तो वाया जाऊ न देता, जर मेट्रोच्या माध्यमातून अधिकाधिक मुंबईकरांना लाभ घेता येत असेल तर त्यावर विचार करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

आरेचा भाग हा जंगल म्हणून घोषित केलेला आहे. काही जणांना कल्पना नसेल असे जगात कुठेही नसेल असे हे जंगल आहे. जगाला शहरांना लागून जंगले आहे. मात्र, प्राणी नाहीत. त्यामुळे सहजीवनाचा विचार केला आहे. पशू-पक्षांचे निवासस्थान सुरक्षित करु शकलो याचे समाधान आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले.