राष्ट्रपती भवनातील एकाही कर्मचार्‍याला ‘कोरोना’ची बाधा नाही ! सचिवालयाकडून स्पष्टीकरण

पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रपती भवनातील एकाही कर्मचार्‍याला कोरोनाची बाधा झालेली नाही. यासंदर्भात मंगळवारी राष्ट्रपतींच्या सचिवालयाकडून निवेदन जाहीर करण्यात आले. राष्ट्रपती भवनाच्या परिसरात राहात असलेल्या कर्मचार्‍याच्या कुटुंबातील सदस्य कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आल्याचे आढळल्यानंतर प्रतिबंधात्मक उपाय करण्यात आले आहेत. तर अन्य कर्मचार्‍यांच्या कुटुंबांचे स्वविलगीकरण करण्यात आले आहे.

राष्ट्रपती भवनाच्या देखभालीसाठी असलेले कर्मचारी कुटुंबांसह याच आवारात राहतात. त्यापैकी एका कर्मचार्‍याच्या कुटुंबातील सदस्य कोरोनाबाधित नातेवाईकाच्या संपर्कात आलेला होता. कोरोनाबाधित नातेवाईकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे या कर्मचार्‍याच्या संपूर्ण कुटुंबाला विलगीकरण केंद्रात स्थलांतरित करण्यात आले असल्याचे निवदेनात म्हटले आहे. बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या कर्मचार्‍याच्या सर्व कुटुंबाची नमुना चाचणी करण्यात आली असून त्यांना बाधा झालेली नसल्याचे आढळले. राष्ट्रपती भवनाच्या आवारात राहाणार्‍या एकाही कर्मचार्‍याला, कुटुंबातील सदस्याला करोनाची बाधा झालेली नाही. मात्र, या कुटुंबांना स्वविलगीकरण करण्यास सांगण्यात आले असून त्यांनी घराच्या बाहेर न पडण्याचा आदेश देण्यात आला आहे. दैनंदिन गरजेच्या वस्तू कुटुंबाला पुरवल्या जात आहेत. राष्ट्रपती भवनातील ये-जा देखील नियंत्रित करण्यात आली असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. शंभरहून अधिक कुटुंबांनी स्वविलगीकरण केले असल्याचे सांगितले जाते.