पक्ष सोडून गेलेल्यांना आता ‘नो-एन्टी’ ! शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, पद्मसिंहांचं नाव निघताच हातच जोडले

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन –  विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय वारे पाहून अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ‘रामराम’ ठोकत अन्य पक्षात प्रवेश केला होता. त्या नेत्यांना आता परत पक्षात स्थान नसल्याची भूमिका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतली आहे. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी पवार हे सोमवारी उस्मानाबाद दौऱ्यावर होते. त्यानंतर त्यांनी वार्ताहरांशी संवाद साधला.

शरद पवार म्हणाले, पक्षातून बाहेर गेलेलं अनेकजण परत येण्यासाठी इच्छुक आहेत. त्याबाबत आम्ही चर्चा करुन निर्णय घेत आहे. मात्र, काही जणांच्या बद्दल आम्ही पक्का निर्णय घेतलाय. त्यांना पुन्हा घेणे नाही. ‘गेलात तिथे सुखी राहा’, असे सांगतोय उस्मानाबादच्या बाबत हाच निर्णय असल्याचे म्हणत पद्मसिंह पाटील यांच्या कुटूंबास राष्ट्रवादीत ‘नो-एन्ट्री’ असल्याचे अप्रत्यक्षणे त्यांनी सांगितले. तद्वतच डॉ. पाटील यांचे नाव येताच त्यांनी कोपऱ्यापासून त्यांना हात जोडले !

चर्चांना पूर्णविराम

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून उस्मानाबादचे नेते पद्मसिंह पाटील हे पवारांसोबत आहेत. शरद पवार यांचे खंदे समर्थक म्हणून त्यांनी आजवर ओळख होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या पद्मसिंह पाटील यांच्या भगिनी आहेत. पण २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पद्मसिंह पाटील आणि त्यांचे पुत्र माजी मंत्री राणा जगजितसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आता महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून जगजितसिंह हे अजित पवार यांच्या संपर्कात असून ते राष्ट्रवादीत परतणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, पवार यांच्या विधानाने या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

विधानसभेपूर्वी या नेत्यांनी ठोकला होता ‘रामराम’

जयदत्त क्षीरसागर, मधुकर पिचड, शिवेंद्रराजे भोसले, वैभव पिचड, राणा जगजितसिंह पाटील, संदीप नाईक, सचिन अहिर आदी नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत अन्य पक्षात प्रवेश केला होता.